Beed crime news clash between two friends over alcohole in ambejogai front police station one injured-ssa97


Beed Crime News : बीडमध्ये सातत्यानं गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. आता पोलीस ठाण्यासमोरच चाकू आणि कोयत्यानं वार केल्याचं समोर आलं आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडची कायदा सुव्यवस्था चव्हाट्यावर आली आहे. दिवसाढवळ्या एका सरपंचाचं अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला. हे प्रकरण ताजे असताना सातत्यानं मारहाण, धमकावणे, असे गुन्हे घडत असून बीडचा ‘बिहार’ झाल्याची टीका होत आहे. आता बीडमध्ये भर पोलीस ठाण्यासमोर एकावर चाकू आणि कोयत्यानं वार केल्याची घटना घडली आहे.

अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयाजवळ असलेल्या पोलीस चौकीच्या समोर एका तरूणावर चौघांनी चाकू आणि कोयत्यानं प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात जमीर उर्फ मुन्ना मोहिद्दीन शेख हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत जमीरचा भाऊ शेख मतीननं पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

– Advertisement –

हेही वाचा : नवऱ्यावर 72 वार, खोटे-खोटे अश्रू ढाळले; पण मोहिनी वाघ अन् प्रियकराचं पितळ ‘असं’ झालं उघड

शेख मतीनच्या फिर्यादीनुसार, श्रीहरी मुंडे हा जमीरला दारू पिण्यासाठी आग्रह करत होता. तेव्हा जमीरनं श्रीहरीला नकार देऊन त्यास शिवीगाळ केली. नंतर गुरूवारी रात्री 12.30 वाजता जमीर स्वारती रूग्णालयासमोरील चौकात बसला होता. त्यावेळी श्रीहरी मुंडे यानं त्यास पोलीस चौकीजवळील ‘एटीएम’ समोर बोलावलं.

– Advertisement –

जमीर तिथे जाताच शिवीगाळ का केली? याचा जाब विचारत श्रीहरीनं त्याच्या मानेवर चाकूनं वार केला. श्रीहरीसोबत असलेल्या आर्यन मांदळे आणि अन्य दोघांनी कोयता आणि चाकूनं जमीरवर प्राणघातक हल्ला केला.

चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जमीरवर स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. शेख मतीनच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी श्रीहरी मुंडे, आर्यन मांदळे आणि अन्य दोघांवर अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : वाल्मिक कराड अन् सुरेश धस यांच्याबाबत धनंजय मुंडेंचा मोठा दावा; म्हणाले, “ते दोघे…”



Source link

Comments are closed.