Beed Crime windmill company security guard shoots at thieves in limbaganesh
बीड : गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा हा चांगलाच चर्चेत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. याचा राजकीय स्तरावर मोठा परिणाम पाहायला मिळाला. माजी मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्यात भाग पाडले गेले. तसेच, बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी व्हावी, पालकमंत्री म्हणून स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जबाबदारी स्वीकारली. मात्र, तरीही अद्याप या जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी कमी झाल्याचे अद्याप समोर आलेले दिसत नाही, अशी टीका विरोधकांनी पुन्हा एकदा केली आहे. शुक्रवारी (23 मे) पवनचक्की कंपनीच्या सुरक्षारक्षकाकडून चोरट्यांवर गोळीबार करण्यात आला आहे. (Beed Crime windmill company security guard shoots at thieves in limbaganesh)
हेही वाचा : Chhagan Bhujbal : हे खाते माझेच होते, भुजबळांकडे पुन्हा अन्न व नागरी पुरवठ्याची जबाबदारी
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील लिंबागणेश परिसरात पवनचक्कीच्या साहित्याची चोरी करण्यासाठी काही चोर आले होते. यावेळी सुरक्षारक्षकाने चोरट्यांवर गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. सदर घटनेसंदर्भात माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या गोळीबारात एका चोरट्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून अद्यापही याबाबत पोलिसांनी कोणतीही पुष्टी केलेली नाही. तसेच, सुरक्षारक्षकाने नेमका गोळीबार का केला? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे पोलिसांकडून काय अधिकृत माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबधित घडामोडीवरून विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. “बीडमध्ये वाढती गुन्हेगारी अतिशय गंभीर आहे. काही केल्या त्याला आळा बसत नाही. ही हेलावून टाकणारी घटना आहे,” अशी टीका शिवसेना ठाकरे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. “पवनचक्कीच्या वादातून हा प्रकार झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातून अजूनही पोलिसांनी कोणताही धडा घेतलेला नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच गुंडांची धमक वाढली आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे. हे कधी थांबेल? असा सवाल त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया म्हणाल्या की, “आता गृहमंत्र्यांनी काहीतरी मोठी पावले उचलण्याची गरज असल्याचे मला वाटते. एकानंतर एक घटना बीड मधून समोर येत आहेत. बीडमधील सर्व पिस्तुल परवाने तात्काळ रद्द करा,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. “ज्यांच्या जीवाला धोका असेल, त्यांना संरक्षण द्या. पण त्यांची पिस्तूल काढून घ्या. आत्ताच्या घटकेला अनेकदा पिस्तुलाचा गैरवापर होताना दिसत आहे. बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा बँड बाजा वाजला आहे. आता बीडमध्ये फौज पाठवली पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,” असे आरोप केले आहेत.
Comments are closed.