Beed News – 73 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन आणि मावेजा वाटपातील तब्बल 73 कोटींच्या महाघोटाळा प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्याचे मास्टरमाईंड मानले जाणारे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना पोलिसांनी लातूर येथून अटक केली आहे. पाठक यांच्या अटकेमुळे महसूल विभागामध्ये मोठी खळबळ उडाली असून, त्यांना आज बीडच्या न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी ज्या जमिनी संपादित करण्यात आल्या, त्या जमिनीच्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) नेमण्यात आले होते. या पथकाने केलेल्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट आदेश तयार करण्यात आल्याचे उघड झाले असून, या माध्यमातून शासनाची 73 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे अविनाश पाठक यांची बदली झाल्यानंतरही मागील तारखा वापरून हे बनावट आदेश काढण्यात आले होते. अशा 154 प्रकरणांमध्ये 241 कोटी रुपयांचा वाढीव मावेजा मंजूर करण्यात आला होता, त्यापैकी 73 कोटी रुपये खातेदारांना वितरितही झाले आहेत.

या संपूर्ण प्रक्रियेची भूसंपादन कार्यालयात कोणतीही अधिकृत नोंद किंवा दस्ताऐवज उपलब्ध नसल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या संगनमताचा संशय बळावला होता. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपविभागीय पोलीस अधिकारी एम. व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या तपास सुरू आहे. या तपासात अविनाश पाठक हेच या घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली.

अविनाश पाठक हे गेल्या 15 वर्षांपासून बीड जिल्ह्यात निवासी जिल्हाधिकारी, जिल्हा बँकेचे प्रशासक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी अशा विविध पदांवर कार्यरत होते. स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय राखून त्यांनी दीर्घकाळ जिल्ह्यात आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. मात्र, त्यांच्या कार्यकाळात जनहिताचे निर्णय घेण्याऐवजी आर्थिक गैरव्यवहार करण्याकडेच त्यांचा कल राहिल्याची टीका आता होत आहे. या घोटाळ्यात केवळ पाठकच नव्हे, तर महसूल विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एक मोठी साखळी सक्रिय असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, लवकरच या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.