अजितदादांच्या स्वप्नातील बीड घडवण्यासाठी कटिबद्ध; पालकमंत्री सुनेत्रा पवारांचा बीडकरांना शब्द
बीड वार्ता: बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आज जिल्ह्याच्या नवनियुक्त पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. अजित पवार यांच्या निधनानंतर झालेली ही पहिलीच बैठक भावूक वातावरणात पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला दिवंगत अजित पवार (Ajit Pawar) यांनी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा आढावा घेणारी एक चित्रफीत दाखवण्यात आली. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शोक प्रस्ताव मांडला.
Sunetra Pawar : विकासाची गंगा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे हीच दादांना खरी श्रद्धांजली
पिंपरी-चिंचवड आणि बारामती प्रमाणे बीड जिल्ह्याचा कायापालट व्हावा, हे दादांचे स्वप्न होते, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. अजितदादांना बीड जिल्ह्याविषयी प्रचंड ओढ होती. त्यांचे जे अपूर्ण स्वप्न आहे, ते पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी एकदिलाने आणि प्रामाणिकपणे काम करावे. विकासाची गंगा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” असेही सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या.
जिल्ह्याच्या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन देताना त्यांनी तांत्रिक बाबींची माहिती दिली. जिल्ह्याचा एकूण विकास आराखडा 585 कोटी रुपयांचा आहे. त्यापैकी 481 कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला. प्राप्त झालेला निधी विहित कालावधीत आणि गुणवत्तेसह खर्च करण्याच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी दिल्या. या बैठकीस (Video Conferencing) ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार नमिता मुंदडा, आमदार सुरेश धस उपस्थित होते. तर सभागृहात निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाणे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव आणि विविध विभागांचे जिल्हाप्रमुख उपस्थित होते.
Dhananjay Munde: बैठकीत धनंजय मुंडेंची भावनिक साद
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक पार पडली. स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्हा नियोजन समितीची ही पहिलीच बैठक असल्याने वातावरण भावनिक होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी स्व. अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडल्यानंतर उपस्थितांना उद्देशून ही भावनिक साद दिली.
आणखी वाचा
Comments are closed.