Beed murder case update walmik karad wife manjili karad attack on suresh dhas and bajrang sonawane manoj jarange
बीड – वाल्मिक कराड याला सात दिवसांची कोठडी आज बीड न्यायालयाने सुनावली आहे. त्यानंतर वाल्मिक कराडची पत्नी मंजली कराड यांनी माध्यमांसमोर येत वाल्मिक कराड यांच्याबद्दल खोटं सांगितलं जात आहे. यापुढे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांचे कारनामे उघड करणार असल्याचा दावा केला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज वाल्मिक कराड यांच्या आई आणि पत्नीची त्यांच्या घरीजाऊन भेट घेतली असे म्हटले जात आहे, त्यावरही मंजली कराड यांनी खुलासा केला.
जमावबंदीमुळे कराड समर्थकांचे आंदोलन स्थगित
वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणासोबत संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. त्याच्यावर 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला असून मकोका अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर वाल्मिक कराड समर्थक रस्त्यावर उतरण्यास सुरुवात झाली आहे. आज वाल्मिक कराडला बीड जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सीआयडीने महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत कराडची 10 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. कोर्टाने सीआयडीच्या युक्तीवादानंतर 22 जानेवारीपर्यंत वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी सुनावली आहे.
वाल्मिक कराडची पत्नी मंजली कराड यांनी काल ठिय्या आंदोलन केले होते. आजही अंदोलन सुरु ठेवले जाणार होते, मात्र पोलीसांनी जमावबंदी आदेश लागू केल्यामुळे आंदोलन केले नाही, असे मंजली कराड यांनी आज संध्याकाळी माध्यमांसोबत बोलताना सांगितले. मंगळवारी कराड समर्थकांचे आंदोलन हिंसक झाले होते. अनेक ठिकाणी जाळपोळ, टायर जाळणे, आत्मदहनाचा प्रयत्न, टॉवरवर चडून आंदोलन करण्यात आले. एका कराड समर्थकाचे पाय देखील भाजले. जमावबंदीचे आदेश असल्यामुळे आज आंदोलन केले नाही, असे मंजली कराडांनी सांगितले.
धनंजय मुंडेंनी कराडच्या कुटुंबियांची भेट घेतली, काय म्हणाल्या मंजली कराड?
वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. कराडला मकोका लागू झाल्यानंतर परळीमध्ये व्यापारी पेठा बंद करण्यात आल्या. संक्रांतीचा बाजार बंद करण्यात आला. त्यानंतर मंत्री मुंडे यांनी तातडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर काल रात्री भेट घेतली आणि तातडीने ते परळीला रवाना झाले. आज सकाळी मंत्री मुंडे यांनी वाल्मिक कराडची आई आणि पत्नीची परळीत भेट घेतल्याच्या बातम्या समोर आल्या. यावर मंजली कराड म्हणाल्या की, धनंजय मुंडे आमच्या घरी आले नाही. त्यांनी आमची भेट घेतली नाही. आमच्याबद्दल चुकीच्या आणि खोट्या बातम्या दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. धनंजय मुंडे यांनी भेट घेतल्याचे वृत्त मंजली कराडांनी फेटाळले.
स्टेप बाय स्टेप सगळं काढणार- मंजली कराड यांचा धस, क्षीरसागर, सोनवणेंना इशारा
मीडिया ट्रायल करुन स्टेप बाय स्टेप माझ्या नवऱ्याच्या एक-एक गोष्टी बाहेर आणल्या, मी देखील स्टेप बाय स्टेप तुमच्या एक-एक गोष्टी बाहेर आणणार, असा इशारा त्यांनी आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना दिला. त्यांच्यासुद्धा अनेक गोष्टी असतील, त्या मी शोधत आहे. त्या गोष्टी मी माध्यमांसमोर आणणार असे आव्हान मंजली कराड यांनी दिले.
हेही वाचा : Walmik Karad : संतोष देशमुखांच्या हत्येचं कारण आलं समोर; बीड न्यायालयातील सुनावणीत SITचा मोठा दावा
Comments are closed.