Beed News – बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे! भर रस्त्यात सशस्त्र हल्ला; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. घाटनांदूर येथील अण्णाभाऊ साठे चौकात शनिवारी (12 जुलै) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर वाकडे (वय 23, रा. पट्टीवडगाव) या तरुणाची तीक्ष्ण हत्यारांनी आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. लातूर येथील एका पावभाजी सेंटरवर कूक म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणारा ज्ञानेश्वर हा सामान्य कुटुंबातील होता. या भयंकर आणि जीवघेण्या हल्ल्यात त्याचा मित्र विवेक माणिक तारसे हा देखील गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात तातडीने उपचार सुरू आहेत. या रक्तरंजित घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी दहशत निर्माण झाली असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर वाकडे आणि त्याचा मित्र विवेक तारसे हे दोघे शनिवारी रात्री दुचाकीवरून घाटनांदूर येथून आपल्या गावी पट्टीवडगावला जाण्यासाठी निघाले होते. ते अण्णाभाऊ साठे चौकात आले असता, अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची दुचाकी अचानक अडवली. काही समजण्याच्या आतच हल्लेखोरांनी दोघांवर तीक्ष्ण हत्यारे आणि कापडात (गमजा) दगड-विटा बांधून अमानुष हल्ला चढवला. या जीवघेण्या मारहाणीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणास्तव झाला, याचे गूढ अद्याप कायम आहे. घटना घडल्यानंतर सर्व आरोपींनी परिसरातील एका मंगल कार्यालयात आश्रय घेतला होता. मात्र पोलीस येताच तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी पाठलाग करून केवळ एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आरोपींना आश्रय देणाऱ्या मंगल कार्यालयाच्या प्रमुखावर गुन्हा दाखल करावा आणि सर्व मुख्य आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी नातेवाईकांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत निदर्शने केली. बीड जिल्ह्यात खून, बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री बीड जिल्ह्यातील ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देणार का, असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
Comments are closed.