‘बालाघाट’ धोक्याची घंटा वाजवतोय! आठ दिवसांत भगदाड पंधरा फूट वाढले
>> उदय जोशी
बीड जिल्हयाचा संरक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बालाघाटच्या डोंगररांगा थरथरताहेत ! स्वतःचा जीव वाचवण्यासाठी संपूर्ण बालाघाट धोक्याची घंटा वाजवतोय… पण विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी देण्याच्या हव्यासापोटी त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. कपिलधार परिसराला जाणारे तडे हा त्याचाच एक भाग असून आठ दिवसांत हे भगदाड तब्बल पंधरा फुटांनी वाढले आहे. प्रशासनाने धावपळ करून काही कुटुंबांचे स्थलांतर केले, परंतु या मलमपट्टीने काहीही होणार नाही, या संपूर्ण परिसराची भूगर्भीय चाचणी होणे आवश्यक आहे.
बालाघाटच्या डोंगररांगा म्हणजे बीड जिल्ह्याची शान! अहिल्यानगर, बीड, भाराशिव असे तीन जिल्हे बालाघाट पर्वतरांगांनी आपल्या पंखाखाली घेतले आहेत. बीड जिल्ह्याचा गडकोट म्हणूनच बालाघाट ओळखला जातो. याच बालाघाटच्या कुशीत पाटोद्याचे मयूर अभयारण्य वसले आहे. मांजरसुंब्याचा आडवळणाचा घाट याच पर्वतराजीतला. पण विकासाच्या नावाखाली अभयारण्याचे तीनतेरा वाजवण्यात आले. मांजरसुंब्यात कधीकाळी घाट होता असे नव्या पिढीला सांगावे लागते. विकासाच्या नावाखाली थेट बालाघाटच्या नरडीलाच नख लावण्यात आले. मुरूमासाठी डोंगरच्या डोंगर कापण्यात आले. एकमेकांच्या आधाराने उभ्या असलेल्या या डोंगररांगांच्या भूगर्भात सध्या प्रचंड वेगवान हालचाली होत आहेत. कपिलधार हे पर्यावरणीय ऱ्हासाचे उत्तम उदाहरण आहे. बालाघाटच्या डोंगररांगांमध्ये वसलेले हे चिमुकले गाव गेल्या आठ दिवसांत पंधरा फुटांनी खचले आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे ही खचण्याची प्रक्रिया वेगाने होत आहे. अतिवृष्टीनंतर कपिलधारवाडीमध्ये हा प्रकोप बघावयास मिळत आहे. एका घराला चीर पडली आणि तासाभरात तिचे मोठे भगदाड झाले. त्यानंतर प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या. कपिलधारकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याला अगोदर साधी चीर पडली.त्यामुळे रस्ता विभागला गेला. आठ दिवसांत ही चीर पंधरा फुटांपर्यंत विस्तारली आहे.
कपिलधारवर निसर्गही कोपला अतिशय निसर्गरम्य असलेल्या कपिलधारवर निसर्गही कोपला आहे. परिसरातील वडाची, लिंबाची झाडे वाळून गेली आहेत. डोंगरावरची माती खचण्याचे प्रमाण वाढल्याने त्या आधाराने तग धरून असलेली झाडेही उन्मळून पडली. त्यानंतर गावातील घरांना भेगा पडायला सुरूवात झाली. कपिलधारमधील संतश्रेष्ठ मन्मथस्वामी समाधी मंदिराच्या कळसालाही तडे गेले. एरव्ही पर्यटकांनी गजबजणारा हा परिसर सध्या दहशतीखाली वावरतोय.
असा झाला पर्यावरणाचा सत्यानाश…
घाटमाथा आणि पायथा यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते करण्यात आले. रस्ते विकास करताना निसर्गाचा आब राखला गेला नाही. मांजरसुंबा, पाटोदा, धारूर, परळीचा घाट म्हणजे बीड जिल्हयातील बालाघाटच्या पर्वतराजीचा प्राणच। पण विकासाच्या नावाखाली बालाघाटच्या डोंगररांगांचा निर्दयपणे बळी घेण्यात आला, एकमेकांच्या आधाराने उभ्या असलेल्या दोन डोंगरांमधून रस्ते काढताना आपण डोंगरांचे नैसर्गिक बंध सैल करत आहोत, याचे भानही ठेवण्यात आले नाही. मुळात या डोंगररांगा सहयाद्रीप्रमाणे आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या नाहीत, प्रचंड वृक्षतोड झाल्याने डोंगररांगामध्ये पावसाचे पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाले. विकास करण्यासाठी माती आणि झाडांचे नातेच तोडण्यात आले. परिणामी पावसाचे पाणी मुरण्याऐवजी वाहून जाण्याचे प्रमाण वाढले.
तांत्रिक पथक पाहणी करणार
कपिलधार येथे घर, जमिनीला पडलेल्या तडधांसंदर्भात अहवाल आला आहे. याच अनुषंगाने तज्ज्ञांचे पथक पुढील आठवड्यात बीडमध्ये दाखल होणार आहे. या पथकाच्या पाहणीनंतर त्यांच्या सल्ल्यानेच पुढील कार्यवाही करण्यात येईल.
विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी
Comments are closed.