आंब्याला उशीर, जांभळाला घाई; बदलत्या हवामानाने फळबागाही गोंधळल्या
यंदाच्या अनियमित हवामानाने फळपिकांचे संपूर्ण गणितच बदलून टाकले आहे. जूनच्या अखेरीस बाजारात दिसणारे जांभूळ यंदा मेच्या सुरुवातीलाच झाडाखाली पडू लागले आहे. दुसरीकडे, फळांचा राजा आंबा अजूनही पाडाच्या अवस्थेतच अडकलेला दिसतो. तापमानातील तीव्र चढ-उतार, कमी झालेली थंडी, अवकाळी पाऊस आणि वाढती उष्णता यामुळे निसर्गाचे पारंपरिक ऋतुचक्र विस्कळीत होत असल्याचे चित्र मराठवाड्यात दिसू लागले आहे.
यंदा हवामानातील मोठ्या बदलांचा परिणाम फळपिकांवर स्पष्ट दिसत आहे. बीडसह मराठवाड्यात केशर आंब्याला मोहर, फलधारणा आणि पिकण्याच्या टप्प्याला उशीर झाला; पण जांभूळ मात्र नेहमीपेक्षा खूप लवकर फळाला आले. मार्च-एप्रिलमध्ये दिवसाचे तापमान झपाट्याने वाढले. जांभूळ हे उष्णता सहन करणारे झाड असल्याने त्याची फुलधारणा आणि फळांची वाढ जलद झाली. एक तर जांभळाच्या देठातील ताकद कमी झाल्याने फळ गळू लागले किंवा ते लवकर खाण्यायोग्य झाले.
यंदा थंडीचा कालावधी कमी होता. आंब्याला विशिष्ट थंड हवामान आणि स्थिर तापमान आवश्यक असते. ते न मिळाल्याने आंब्याचा विकास मंदावला. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे आंब्याच्या मोहरावर परिणाम झाला. अनेक भागांत मोहर गळाला, त्यामुळे फळधारणा उशिरा झाली. जांभळावर मात्र त्याचा तुलनेने कमी परिणाम झाला. रात्रीचे तापमानही जास्त राहिल्याने जांभळाची फळे वेगाने परिपक्व झाली. म्हणूनच मेच्या सुरुवातीलाच फळे काळी पडून गळू लागली.
गेल्या काही वर्षांत ऋतुचक्र बदलत आहे. अनेक फळपिकांची नैसर्गिक वेळ पुढे-मागे होत आहे. यंदा जांभूळ साधारण महिनाभर आधीच फळाला लागले असून काही ठिकाणी जांभळाची गळ वाढली आहे.
आंब्यावर जांभळाचा उतारा
आंब्याचा बहर संपत आल्यानंतर जांभूळ हे फळ आकाराला येते. ‘आंब्यावर जांभळाचा उतारा’ असे ग्रामीण भागात म्हटलेही जाते. आंबा खाल्ल्यानंतर शरीरातील साखरेचे प्रमाण आपसूकच वाढते, ते नियंत्रणात ठेवण्यासाठी जांभूळ खाणे फायदेशीर ठरते. निसर्गाने लावलेले हे चक्र विज्ञानाचा आधार मानले जाते. शुगर वाढीवर जांभूळ किंवा जांभळाच्या बियांची पावडर रामबाण उपाय ठरते. म्हणूनच ‘उन्हाळ्यात भरपूर आंबे खा अन् पावसाळा सुरू झाला की जांभूळ खा’ असे म्हटले जाते, जेणेकरून शरीरातील साखर नियंत्रणात राहते. यंदा आंबा उशिराने खावा लागत असताना जांभूळ मात्र दीड महिना आधीच फळाला लागले आहे.
हवामानातील आर्द्रता वाढल्याने जांभूळ वेळेआधीच फळाला
वाढलेले तापमान, प्रचंड उष्णता आणि त्या प्रमाणात हवामानातील वाढलेली आर्द्रता यामुळे जांभूळ फळाचा देठ कमकुवत होतो. वेळेआधीच एक तर फळ गळून पडत आहे किंवा त्यातील काही जाती फळाला लागत आहेत. ऋतुचक्र दोन-अडीच महिन्यांनी बदलले असल्याचे जाणवत आहे.
-प्रवीण येवले, जांभूळ उत्पादक, पाचंग्री, पाटोदा
Comments are closed.