वडिलांच्या शरीरातून भळभळते रक्त दिसले नाही का? वैभवी देशमुखच्या प्रश्नाने नामदेव शास्त्री निरुत्तर

बाबा तुम्ही म्हणालात की, आरोपींना थापड मारली म्हणून त्यांनी हा प्रकार केला. त्यामुळे आरोपीचीही मानसिकता बघायला हवी होती. पण या एका थापडीमुळे माझे वडील गेले. तेव्हा आमची मानसिकता बघायला नको का? माझ्या वडिलांच्या शरीरावर एवढे घाव घातल्याने त्यांच्या शरीरातून भळभळणारे रक्त तुम्हाला दिसले नाही का? त्यांना एवढा मार दिला होता की, अस्थी विसर्जनाच्या वेळी त्यांच्या शरीरातील फक्त तीन हाडे सापडली. हुंदके देत वैभवीने मांडलेल्या या कैफियतीपुढे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री निरुत्तर झाले.

धनंजय मुंडेंना पाठीशी घालत नामदेव शास्त्री महाराज यांनी भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचे म्हणत आरोपींचीही मानसिकता बघायला पाहिजे होती, असे वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यात मोठा गोंधळ उडाला. राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सामाजिक सलोख्याचा प्रश्न ऐरणीवर आणणाऱया बाबांच्या या विधानाने देशमुख कुटुंबही अस्वस्थ झाले.

आरोपींची मानसिकता तपासायला हवी होती

नेत्यांनी आणि आपण आरोपींची खरी मानसिकता तपासायला हवी होती, आम्ही कधीही जातीयवाद केला नाही, एका दलित मुलाच्या मदतीला आमचे भाऊ धावून गेले होते. आमच्या शेतात आजही वंजारा समाजाचे शेतगडी आहेत, अशा भावना धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्री यांच्याकडे व्यक्त केली.

वैभवीच्या प्रश्नाने महंत सुन्न

संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने पाणावलेल्या डोळय़ांनी हुंदके अन् टाहो फोडत देशमुख कुटुंबीयांची व्यथा मांडली. तुम्हाला त्यांना मारलेली थापड दिसली पण माझ्या वडिलांच्या शरीरातून भळभळणारे रक्त दिसले नाही का, असा आर्त प्रश्न उपस्थित केला. काळजाला हात घालणाऱया वैभवीच्या या प्रश्नाने न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज निरुत्तर झाले. आपल्या शब्दांचा वेगळा अर्थ काढण्यात आला आहे. आपण आरोपींचे समर्थन करत नाही, भगवानगड देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी राहील, असा शब्द देऊन त्यांना प्रसादाला घेऊन गेले.

तगडा पोलीस बंदोबस्त

आज रविवारी देशमुख कुटुंब अन् मस्साजोग ग्रामस्थ नामदेव शास्त्री यांना भेटून संतोष देशमुख हत्याकांडातील पुरावे सादर करणार असून, त्यासाठी ते भगवानगडावर येऊन नामदेव शास्त्री यांची भेट घेणार असल्याची बातमी वाऱयासारखी जिह्यात पसरली. या पार्श्वभूमीवर गडावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रवेशद्वारावरच पोलिसांची एक तुकडी तैनात करण्यात आली होती.

गडालाच 50 हजारांची देणगी

देशमुख कुटुंबीयांना मदत करण्याची तयारी दाखवत मुलांचे शिक्षण गडावर करू, असे नामदेव शास्त्री यांनी म्हटले होते. मात्र त्यांची ही मदत नम्रपणे नाकारत आम्हाला मदत नको, न्याय हवा असे म्हणत देशमुख कुटुंबीयांनी गडाच्या बांधकामासाठी पन्नास हजारांची देणगी आज प्रत्यक्षपणे महंतांकडे दिली.

दर्शन घेऊन हत्येचे पुरावे सादर

न्यायाचार्य यांनी प्रसारमाध्यमांशी प्रतिक्रिया देऊन देशमुख कुटुंबीयांना मदतीचा हातही पुढे केला. या वादंगानंतर देशमुख कुटुंबीयांनी आज रविवारी गावकऱयांसह भगवानगड गाठून भगवानबाबा समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर महंत नामदेव शास्त्री यांचे दर्शन घेऊन त्यांच्याकडे स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येचे पुरावे सुपूर्द केले. सोबत या प्रकरणातील आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची कुंडलीही दिली. या आरोपींच्या गाडीवर कोणत्या नेत्याचे फोटो होते, कोणत्या नेत्याने आरोपींना पाठीशी घातले याची इत्यंभूत माहिती देशमुख कुटुंब आणि मस्सजोग ग्रामस्थांनी महंतांना दिली.

Comments are closed.