बीड पुन्हा हादरले, पगार रखडवल्याने शिक्षकाची आत्महत्या

अठरा वर्षांपासून आश्रमशाळेत विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकाने पगार मागितल्यानंतर निष्ठुर संस्थाचालकाने ‘फाशी घे! म्हणजे तुझ्या जागेवर मला नवीन शिक्षक घेता येईल…’ असे बेशरम उत्तर दिले. एकीकडे पगार नसल्यामुळे होणारी आर्थिक कुचंबणा आणि दुसरीकडे संस्थाचालकाकडून होणारा अमानवी छळ अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या या शिक्षकाने आपल्या तीन वर्षांच्या मुलीची माफी मागून संस्थाचालकाच्या बँकेसमोरच गळफास घेऊन आत्महत्या केली.

एकेकाळी ‘चंपावतीनगरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीडला गुन्हेगारी, गुंडगिरी, माफिया, खंडणीखोर, मस्तवाल राजकारण्यांची नजर लागली आहे. खंडणीला विरोध केला म्हणून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कराड गँगने अमानुष छळ करून हत्या केली. या हत्येचे वादळ अजून घोंगावत असतानाच आज संस्थाचालकाच्या छळाला कंटाळून धनंजय अभिमान नागरगोजे या शिक्षकाने गळफास घेतला.

केज तालुक्यातील देवगाव येथील धनंजय नागरगोजे हे गेल्या अठरा वर्षांपासून तालुक्यातीलच केळगाव येथील विक्रम मुंडे यांच्या गजराम मुंडे निवासी आश्रमशाळेत विनाअनुदानित तत्त्वावर शिक्षक म्हणून काम करत होते. राज्य सरकारने 2019 मध्ये विनाअनुदानित शाळांना 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला, पण हे अनुदान अद्यापही सुरू झालेले नाही. आश्रमशाळांना सरकारकडून वेगवेगळ्या माध्यमातून निधी देण्यात येतो. त्यातूनच शिक्षकांचे पगार करणे अपेक्षित आहे, परंतु संस्थाचालकांच्या हातून कवडीही सुटत नसल्याने विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांवर उपासमारीचीच वेळ आली आहे. धनंजय नागरगोजेही वारंवार पगार मागून थकून गेले. परंतु संस्थाचालक विक्रम मुंडेंना त्यांची दया आली नाही. उलट पगार मागताच मुंडेंनी नागरगोजे यांना ‘तू गळफास घे, म्हणजे तुझ्या जागेवर मला दुसरा शिक्षक घेता येईल,’ असे उद्दाम उत्तर दिले.

अठरा वर्षांपासून काम करून पगार नाही, आर्थिक अडचणीमुळे होणारे कुटुंबाचे हाल आणि पगार मागितला म्हणून संस्थाचालकाकडून होणारा छळ याला कंटाळून धनंजय नागरगोजे यांनी बीड शहरातील स्वराजनगर भागात असलेल्या कृष्णा अर्बन बँकेसमोरच गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे ही कृष्णा अर्बन बँक विक्रम मुंडे यांचीच आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

श्रावणी बाळा, मला माफ कर!

‘श्रावणी बाळा, तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर. तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्नं पाहिली होती, पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागले. शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापूला माफ. कारण मी तुला एकट्याला सोडून जात आहे. बाळा, बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही. पण विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे, उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे.

मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं की, मी तुमच्या शाळेवर गेली 18 वर्षे झालं काम करतोय. अजून मला पगार नाही. आता पुढे काय करायचं? त्यावर विक्रमबप्पा म्हणले, ‘तू फाशी घे. म्हणजे तू मोकळा आणि मी पण तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी भरायला मोकळा. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. श्रावणी बाळा, हे सर्व राक्षस आहेत. या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे. तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती, पण मी एक दळभद्री बाप म्हणून तुझ्या वाट्याला आलो. काय करू, माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही. मी थांबतो, खूप त्रास होतोय मला…, अशी पोस्ट धनंजय नागरगोजे यांनी मुलीला उद्देशून केली आहे.

Comments are closed.