दिव्यांगांसाठी ठाण्यातील सिग्नल ‘बोलू लागले’

मुंबईच्या वेशीजवळ असलेल्या ठाण्यातील तीन हात नाक्यावरील सिग्नल आता बोलू लागला आहे. शहरातील अती वर्दळीचा आणि महत्त्वाचा सिग्नल असल्याने येथे रोजच वाहतुकीचा जांगडगुता असतो. या रस्त्यावर कोणताही ओव्हरहेड ब्रीज किंवा भुयारी मार्ग नसल्याने रस्ता ओलांडणे दिव्यांगांसोबतच अन्य नागरिकांसाठीही जिकिरीचे ठरले होते. परंतु दिव्यांगांना हा रस्ता सहज ओलांडता यावा यासाठी ठाणे वाहतूक शाखेने पालिकेच्या सहकार्याने प्रायोगिक तत्त्वावर बीप सिग्नल सुरू केला आहे. या अत्याधुनिक सिग्नलवर दिव्यांगांसाठी विशेष झेब्रा क्रॉसिंग, रॅम्प, रेलिंग लावले आहेत. तर दृष्टीहीन नागरिकांना रस्ता ओलांडताना कोणताही अडथळा होऊ नये यासाठी सांकेतिक आवाजाचे बीप आणि ब्रेन लिपीत लिहिलेले बोर्ड लावण्यात आले आहेत. त्यामुळे दिव्यांगांना हा रस्ता ओलांडणे एकदम सोपे झाले आहे. ही यंत्रणा यशस्वी पार पडल्यास शहरातील अन्य महत्त्वाच्या सिग्नलवर ही सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली.

Comments are closed.