आयपीएलपूर्वी लखनौ सुपर जायंट्सने केला मोठा बदल, संघाचे नशीब बदलायला येणार 'हा' दिग्गज

न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विलियमसन आता लखनौ सुपर जायंट्स संघात सहभागी झाला आहे. तो आयपीएल 2026 मध्ये लखनौ संघाचा रणनीतिक सल्लागार म्हणून दिसणार आहे. गेल्या वर्षी लखनौ सुपर जायंट्स संघ पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानावर होता, आणि आता विलियमसनच्या अनुभवामुळे संघ यावेळी अधिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू रिषभ पंत हाच या संघाचा कर्णधार आहे, ज्याला लखनौ सुपर जायंट्सने तब्बल 27 कोटी रुपयात विकत घेतले आहे.

लखनौ सुपर जायंट्स संघाचे मालक संजीव गोयनका यांनीही एक्सवरून माहिती दिली की, केन विलियमसन याआधीही लखनौ सुपर जायंट्स फ्रँचायझीचा भाग राहिले आहेत आणि आता त्यांना नव्या भूमिकेसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे, क्रिकेटविषयक समज आणि खेळाडूंना प्रेरणा देण्याच्या क्षमतेमुळे संघाला नक्कीच फायदा होईल.

केन विलियमसन यांच्याबरोबरच डॅनियल क्रो यांची स्पिन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विलियमसन आणि डॅनियल आता लखनौ सुपर जायंट्स संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांच्यासोबत काम करतील. भारतीय संघाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण हे देखील या संघाशी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जोडले गेले आहेत. मागील हंगामात लखनौ संघाचे मेंटॉर राहिलेले झहीर खान आता लखनौ सुपर जायंट्स संघासोबत नाहीत.

केन विलियमसन यांनी लखनौ सुपर जायंट्स संघात नव्या भूमिकेबाबत बोलताना म्हटले, “मी लखनौ संघाशी जोडल्याबद्दल खूप उत्साहित आहे. त्यांच्या स्क्वाडमध्ये खूप प्रतिभावान खेळाडू आहेत, आणि मी उत्कृष्ट प्रशिक्षकांसोबत काम करण्यासाठीही उत्साहित आहे. आयपीएलशी जोडलेले राहणे खास आहे, ही क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फ्रँचायझी लीग आहे.”

केन विलियमसन अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहेत आणि त्यांच्या 371 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या करिअरमध्ये त्यांनी 19,086 धावा केल्या आहेत. तसेच, आयपीएलमध्ये 79 सामन्यांमध्ये 2128 धावा केल्या असून त्यात 18 अर्धशतके देखील समाविष्ट आहेत.

Comments are closed.