आशिया कप आधीच 'हा' पाकिस्तानी खेळाडू निवृत्त, अचानक घेतलेल्या निर्णयाने खळबळ!
आशिया कप 2025चा शुभारंभ आजपासून होणार आहे. त्याआधीच एका पाकिस्तानी खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. या खेळाडूचे नाव उस्मान शिनवारी आहे. त्यांनी पाकिस्तानकडून 2013 मध्ये पदार्पण केले होते आणि आता 12 वर्षांनंतर आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला विराम देण्याचा निर्णय घेतला आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे पाकिस्तानी चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
डावखुरा वेगवान गोलंदाज उस्मान शिनवारीने पाकिस्तानसाठी पहिला सामना डिसेंबर 2013 मध्ये खेळला होता. त्यानंतर त्यांनी 34 सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. गेल्या 6 वर्षांपासून त्यांना संघात स्थान मिळत नव्हते. ऑक्टोबर 2019 मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्यांनी आपला शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर त्यांना संघातून बाहेर करण्यात आले. परतण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले, पण त्यांना पुन्हा देशासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही.
उस्मान शिनवारीने पाकिस्तानसाठी 17 एकदिवसीय सामने खेळले आणि त्यात 34 बळी घेतले. यावेळी त्यांची इकॉनॉमी फक्त 4.94 इतकी होती. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी 2 वेळा पाच बळी घेतले होते. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत शिनवारीने पाकिस्तानकडून 16 सामने खेळले आणि त्यात 13 बळी घेतले. या काळात त्यांची इकॉनॉमी 8.31 होती. उस्मानला आपल्या देशासाठी केवळ एकच कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली, ज्यात त्यांनी एक बळी घेतला होता.
पाकिस्तानसाठी खेळताना उस्मानची सर्वोत्तम कामगिरी ऑक्टोबर 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध झाली होती. या सामन्यात शिनवारीने श्रीलंकन फलंदाजांची चांगलीच वाट लावली होती. त्यांनी सामन्यातील केवळ 21व्या चेंडूवर पाच बळी घेतले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद पाच बळी घेणाऱ्या गोलंदाजांपैकी ते एक ठरले आहेत. उस्मानला मागील 6 वर्षांपासून संधी मिळत नव्हती आणि त्यामुळेच केवळ 31 वर्षांच्या वयात त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करावा लागला.
Comments are closed.