ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी संजू सॅमसन भावुक! वारंवार दुर्लक्षित होण्यावर सोडलं मौन
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची (Team india)घोषणा झाली आहे. टी-20 संघात संजू सॅमसनचं (Sanju Samson) नाव आहे, पण वनडे संघातून त्याला वगळण्यात आलं आहे. ही गोष्ट खूप काळापासून सुरू आहे. संजूने वनडे क्रिकेटमध्ये शेवटची शतकी खेळी केली होती. डिसेंबर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने हे शतक केले होते. टी-20 संघात मात्र संजूने आपली जागा पक्की केली आहे आणि सातत्याने चांगला खेळ करत आहे. करिअरमध्ये अनेकदा त्याला टीममधून आत-बाहेर करण्यात आलं. आता वारंवार दुर्लक्ष केल्यावर संजूने अखेर मौन सोडलं आहे.
एका स्पोर्ट्स कास्ट पॉडकास्टमध्ये बोलताना संजू सॅमसनने आपल्या पहिल्या वनडे शतकाबद्दल आणि संघातून बारंवार बाहेर टाकण्यात आल्याबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणाला, माझं पहिलं शतक दक्षिण आफ्रिकेत आलं. त्या वेळी मी कधी संघात होतो, कधी बाहेर जात होतो, काही सामने खेळत होतो. पण माझ्या मनात खात्री होती की, मी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास योग्य आहे. मात्र, जोपर्यंत तुम्ही लोकांसमोर स्वतःला सिद्ध करत नाही, तोपर्यंत तुम्हाला मान्यता मिळत नाही.
संजू पुढे म्हणाला, त्या शतकानंतर खेळाडू काय बोलत होते हे मला माहीत नव्हतं, पण माझ्या मनात स्पष्ट होतं की, मी या लेव्हलसाठी बनलो आहे. तो मालिकेचा निर्णायक सामना होता. मला माहीत होतं की जर मी तिथे चांगलं प्रदर्शन केलं नाही, तर मला बाहेर काढलं जाईल. त्यामुळे जेव्हा मी कठीण प्रसंगी शतक झळकावलं, तेव्हा मी स्वतःलाच सांगितलं, हो, मी हे करू शकतो आणि मी मोठ्या गोष्टींसाठी बनलो आहे.
संजू सॅमसनने जुलै 2021 मध्ये वनडे पदार्पण केलं. तेव्हापासून त्याने 16 वनडे सामने खेळले असून 14 वेळा त्याला फलंदाजीची संधी मिळाली. त्यामध्ये त्याने एकूण 510 धावा केल्या असून त्याची फलंदाजी सरासरी 56.66 आहे. त्याची सर्वोत्तम खेळी 108 धावांची आहे. त्याने वनडेत 1 शतक आणि 1 अर्धशतक ठोकलं आहे. हा रेकॉर्ड पाहता स्पष्ट आहे की, संजूला टीम इंडियात नक्कीच संधी मिळायला हवी.
Comments are closed.