भारत-पाक सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवने उघडले ड्रेसिंग रूम मधील रहस्य, 'या' सामन्यात का नाही खेळला सूर्या?

ओमानविरुद्ध टीम इंडिया लीग स्टेजमधला आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी उतरली. त्यावेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, 8 गडी बाद झाल्यानंतरही सूर्या स्वतः फलंदाजीसाठी आला नाही. यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनावर अनेक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. याचे उत्तर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत दिले असून, या निर्णयामागचे कारणही स्पष्ट केले आहे.

ओमानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा फलंदाजी क्रम मोठ्या प्रमाणात बदलला. टीम इंडियाने 20 षटकात 8 गडी गमावून 188 धावा केल्या. पण 8 गडी बाद झाल्यानंतरही सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला नाही. सूर्या आधी कुलदीप यादव, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग फलंदाजीसाठी उतरले. यामागचे कारण सांगताना सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत म्हटले, “2-3 षटके बाकी होती आणि अर्शदीप सिंग माझ्याकडे आला व म्हणाला की त्याला फलंदाजी करायची आहे, मी म्हटले काही हरकत नाही.” मात्र अर्शदीप सिंगला फलंदाजीत काही विशेष कमाल करता आली नाही आणि तो केवळ 1 धाव करून रनआऊट झाला. त्यानंतरही सूर्या मैदानात उतरला नाही आणि कुलदीपला फलंदाजीसाठी पाठवले.

जरी ओमानविरुद्ध टीम इंडियाने फलंदाजी क्रमात मोठे बदल केले असले, तरी पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 सामन्यात टीम इंडिया मोठे बदल करू शकते. प्लेइंग 11 मध्ये जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांची पुनरागमन जवळजवळ निश्चित मानले जात आहे. अशा परिस्थितीत अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांना पुन्हा एकदा बाकावर बसवले जाऊ शकते. दरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादवही पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरण्याची शक्यता आहे. सूर्या तिसऱ्या क्रमांकावर खेळताना नेहमीच उत्तम कामगिरी करत आला आहे.

Comments are closed.