महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींची फसवणूक; शिवसेना महिला आघाडीच्या वतीने प्रशासनाला निवेदने

राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीवेळी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर येऊनदेखील या आश्वासनाची पूर्तता अद्यापि सरकारने केलेली नसल्याने महिलांचा अपेक्षाभंग झाला आहे. सरकारने तातडीने थकीत व आश्वासनुसार 2100 रुपये महिलांना द्यावेत, अशी मागणी गडहिंग्लज येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या वतीने प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांच्या उन्नतीसाठी सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी
बहीण योजना’ सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत सदर निधी पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात आले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर एकवीसशे रुपयांचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात पंधराशे रुपयेच महिलांच्या खात्यावर जमा होत असल्याने त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शासनाने तातडीने एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यावर जमा करावेत, अशी मागणी या निवेदनातून केली आहे.

यावेळी शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा महिला संघटिका शांता जाधव, माजी नगरसेविका श्रद्धा शिंत्रे, अॅड. स्नेहल पाटील, स्वरूपा पेंडुरकर, मधुरा कांबळे, मेरी डिसोझा, मंगल जाधव, रूपाली देसाई, रोहिणी भंडारे, रेखा सुतार, शालन कासारीकर, वंदना कोळी, सुषमा कासारीकर, वैशाली घोटणे, अश्विनी भोसले यांच्यासह महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Comments are closed.