‘कोणी डरपोक उरला असेल तर त्यानेही हॉलबाहेर जावं’, UN मध्ये वॉकआउट करणाऱ्या राजनैतिक अधिकाऱ्यांवर नेतन्याहू भडकले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

संयुक्त राष्ट्र महासभेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू भाषण करण्यासाठी व्यासपीठावर येताच अनेक देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी सभागृहातून सभात्याग केला. गाझामधील इस्रायलच्या धोरणांवर आंतरराष्ट्रीय पातळीवरून तीव्र विरोध होत असताना हा सभात्याग पाहायला मिळाला. अनेक प्रतिनिधी बाहेर पडत असताना सभागृहात उपस्थित असलेल्या काही समर्थकांनी टाळ्या वाजवून “ॲम इस्रायल चाई” अर्थात इस्रायलचे लोक अमर राहोत अशा घोषणा दिल्या.

अधिकाऱ्यांच्या या सभात्यागावर नेतन्याहू यांनी मंचावरूनच जोरदार हल्ला केला. जर या सभागृहात अजूनही कोणी डरपोक उरले असतील, तर त्यांनीही आत्ताच बाहेर निघून जावे, असे ते भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले. यानंतर त्यांनी आपल्या भाषणात इस्रायल लावण्यात आलेले वंशसंहाराचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. तसेच इराणचा उल्लेख करताना नेतन्याहू यांनी दावा केला की, सभात्याग करणाऱ्यांपैकीच अनेक देशांच्या प्रमुखांनी इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईसाठी इस्रायलचे खासगीत आभार मानले होते.

“जे प्रतिनिधी आत्ताच सभागृह सोडून गेले, त्यातील अनेक देशांचे संरक्षणही आज इस्रायलच करत आहे,” असे सांगत नते पुढे म्हणाले, “वास्तविक पाहता, इराणचे अणुप्रकल्प नष्ट केल्याबद्दल यातील अनेक देशांच्या नेत्यांनी खासगीत आमचे आभार मानले आहेत, हे मला तुम्हाला सांगायचे आहे. यापेक्षा मोठे ढोंग काय असू शकते? हे अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगायचे झाल्यास त्यांचा दुटप्पीपणा आहे, असेही नेतन्याहू म्हणाले.

इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ल्यांचे समर्थन करताना नेतन्याहू म्हणाले की, हा निर्णय कठीण होता पण अत्यंत आवश्यक होता. इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ला करणे खूप कठीण होते. पण पंतप्रधान म्हणून मला घ्याव्या लागलेल्या निर्णयांपैकी हा सर्वात सोपा निर्णय होता. कारण आम्ही हे केले नसते, तर आज आपण सर्वजण जिवंत नसतो.

दरम्यान, नेतन्याहू यांच्या संपूर्ण भाषणादरम्यान इराणी प्रतिनिधींनी सभागृहावर बहिष्कार टाकला होता. इराणी प्रतिनिधींनी आपल्या रिकाम्या खुर्चीवर इराणच्या कुड्स फोर्सचे माजी कमांडर जनरल कासेम सुलेमानी यांचे छायाचित्र ठेवले होते.

Comments are closed.