MPL 2025: एमपीएल 2023 चे कंजूसलाल! यांच्या बॉलिंगवर रन काढणे अवघड होते

MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) चा तिसरा हंगाम 4 जून रोजी सुरू होणार आहे. आयपीएल संपल्यानंतर दुसऱ्या दिवशीच 20 दिवसांची ही स्पर्धा रंगेल. एका दिवशी तीन-तीन सामन्यांचा थरार आपल्याला यावेळी पाहायला मिळणार आहे. पहिल्या दोन हंगामाप्रमाणेच यावेळी देखील अनेक रोमांचक सामने पाहायला मिळू शकतात. तिसऱ्या हंगामाची सुरुवात होण्यापूर्वी आपण मागील दोन हंगामातील खेळाडूंची व संघांची कामगिरी माहित करून घेत आहोत. आज आपण एमपीएल 2023 मध्ये सर्वात चांगला इकॉनोमी रेट राखणाऱ्या गोलंदाजांविषयी (कमीत कमी 12 षटके) जाणून घेऊया.

एमपीएल 2023 स्पर्धेसाठी सोलापूर रॉयल्स संघाने विकी ओस्तवाल (Vicky Ostwal) याला आपला आयकॉन खेळाडू म्हणून घोषित केले होते. भारताच्या अंडर 19 संघासोबत विश्वचषक जिंकल्यानंतर व आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग झाल्यानंतर तो एमपीएलमध्ये सहभागी होत होता. आपल्या याच अनुभवाचा लाभ करून घेत त्याने 5 सामन्यात 20 षटके गोलंदाजी करताना फक्त चार बळी मिळवले. मात्र, त्याचा इकॉनोमी रेट हा केवळ 5.20 इतका जबरदस्त राहिला.

पहिल्या हंगामात कोल्हापूर टस्कर्स संघातील अनेक गोलंदाज बरेच महागडे ठरले होते. मात्र, डावखुरा वेगवान गोलंदाज आत्मन पोरे (Atman Pore) याला अपवाद होता. पहिल्या सामन्यापासून त्याने टिच्चून गोलंदाजी करताना 14 षटके गोलंदाजी करत 6.29 च्या मामुली इकॉनोमी रेटने धावा दिल्या. आत्मनने पाच सामन्यात सहा बळी आपल्या नावे केले होते.

छत्रपती संभाजी किंग्स संघासाठी एमपीएल 2023 फारशी चांगली राहिली नव्हती. संघाला सहा संघांच्या गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. मात्र, संघाचा डावखुरा फिरकी गोलंदाज हितेश वाळुंज (Hitesh Walunj) हा उत्कृष्ट कामगिरी करून चर्चेत आलेला. त्याने पाच सामन्यात 19 षटके गोलंदाजी करताना 4 बळी टिपलेले. यादरम्यान त्याने 6.47 असा उत्कृष्ट इकॉनॉमी रेट राखलेला.

या तिघांव्यतिरिक्त रत्नागिरी जेट्सचा कुणाल थोरात (6.64), सोलापूर रॉयल्सचा सुनील यादव (6.75) व ईगल नाशिक टायटन्सचा अक्षय वायकर (6.89) या गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट देखील सात पेक्षा कमी राहिला होता. तर, सात असे गोलंदाज होते ज्यांचा इकॉनॉमी रेट हा 8 पेक्षा कमी राहिलेला.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 2023 मध्ये या स्पर्धेची सुरुवात झाली होती. सलग तिसऱ्या वर्षी क्रिकेटप्रेमींना ही स्पर्धा गहूंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर विनामूल्य पाहता येणार आहे. यावर्षी एमसीएने प्रथमच महिलांसाठी WMPL सुरू केले आहे. या दोन्ही स्पर्धांचे थेट प्रक्षेपण OTT वर JioHotstar व टेलिव्हिजनवर Star Sports 2 चॅनेलवर होणार आहे. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 Tv Channel)

Comments are closed.