22 चेंडूमध्ये 6 विकेट्स! आयपीएलच्या इतिहासातील सर्वात घातक स्पेल, फलंदाज हैराण

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६चा हंगाम २८ मार्चपासून सुरु होत आहे. यामध्ये पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात खेळला जाणार आहे. नव्या हंगामाच्या सुरुवात कधी होत अशी चिंता चाहत्यांना सतावत होती. बीसीसीआयने पहिल्या २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे या आयपीएल हंगामात कोणता सामना रोमांचक होणार याकडे लक्ष असेल. हा रोमांच सुरू होण्याआधी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात घातक गोलंदाजी जाणून घेऊ.
आयपीएलचा यंदा १९वा हंगाम असणार आहे. त्यामधील २०१९ मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात असे काही घडले जे जाणून आजही आश्चर्य वाटेल. या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजाने धमाकेदार कामगिरी केली होती. हैद्राबादमध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात वेस्ट इंडिजचा गोलंदाजा अल्जारी जोसेफने फलंदाजांना सळो की पळो करुन सोडले होते.
त्या सामन्यात हैद्राबादचा कर्णधार भुवनेश्वर कुमारने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय योग्य ठरल्याचे दिसले, कारण मुंबईने २० षटकात ७ विकेट्स गमावत केवळ १३६ धावा केल्या. त्यामध्ये कायरन पोलार्ड ४६ धावा करत नाबाद राहिला होता. त्यामुळे घरच्याच मैदानावर हैद्राबादला माफक लक्ष्य मिळाले आणि ते सहज सामना जिंकतील असे वाटले, मात्र जोसेफच्या वेगामुळे हैद्राबादची फलंदाजी कोसळली.
जोसेफने ३.४ षटके गोलंदाजी करताना १२ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ठ स्पेल ठरली. हा विक्रम करताना त्याने सोहेल तन्वीरला मागे टाकले. सोहेलने २००८मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ४ षटकात १४ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या.
जोसेफने त्या सामन्यात डेविड वॉर्नर, विजय शंकर, दीपक हुडा, राशिद खान, सिद्धार्थ कौल आणि भुवनेश्वर कुमारला बाद केले. त्याला बाकी गोलंदाजांनीही चांगली साथ दिली. जसप्रीत बुमराहने ३ षटकात १६ धावा देत एक विकेट घेतली. तसेच जेसन बेहरेंडॉर्फने एक आणि राहुल चाहरने २ विकेट्स घेतल्या. हा सामना मुंबईने ४० धावांनी जिंकला.
Comments are closed.