MPL 2025: कमाल स्पेल! एमपीएल 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी स्पेल टाकणारे गोलंदाज
MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) ची सुरुवात काही दिवसांमध्येच होणार आहे. हा स्पर्धेचा तिसरा हंगाम असेल. तिसऱ्या हंगामात प्रवेश करण्यापूर्वी आपण मागील दोन हंगामातील सर्वोत्कृष्ट कामगिरीचा आढावा घेत आहोत. आज आपण एमपीएल 2023 मध्ये टाकल्या गेलेल्या सर्वोत्तम गोलंदाजी स्पेलविषयी जाणून घेणार आहोत.
एमपीएल 2023 मध्ये पीबीजी कोल्हापूर टस्कर्स व ईगल नाशिक टायटन्स यांच्या दरम्यान साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळला गेला होता. या सामन्यात कोल्हापूर संघाने वर्चस्व गाजवले असताना अखेरच्या क्षणी, मध्यमगती गोलंदाज मनोज यादव (Manoj Yadav) हा गोलंदाजीसाठी आला. त्याला केवळ दोन षटके टाकण्यास मिळणार होती. त्यावेळी त्याने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात अविस्मरणीय स्पेल टाकला. मनोजने केवळ सहा धावा देताना पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यामध्ये एका हॅट्रिकचा देखील समावेश होता. ही स्पर्धेच्या इतिहासातील पहिली हॅट्रिक होती.
मनोज प्रमाणेच स्पर्धेतील दुसरा सर्वोत्तम गोलंदाजी स्पेल हा देखील कोल्हापूर संघाचाच फिरकीपटू श्रेयस चव्हाण (Shreyas Chavan) याने टाकला. कोल्हापूर संघाला प्ले ऑफ्समध्ये प्रवेश करण्यासाठी छत्रपती संभाजी किंग्स संघाला या सामन्यात पराभूत करणे आवश्यक होते. श्रेयसने आपल्या फिरकीची जादू दाखवत 4 षटकांमध्ये केवळ वीस धावा देताना चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
पहिल्या हंगामात केवळ तीन सामने खेळून अष्टपैलू म्हणून नाव कमावलेल्या ईगल नाशिक टायटन्स संघाच्या अर्शिन कुलकर्णी (Arshin Kulkarni) याने गोलंदाजीतही आपला प्रभाव टाकला. पुणेरी बाप्पा संघाविरुद्ध शतक झळकावल्यानंतर, त्याच सामन्यात त्याने तुफानी गोलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला. त्याने अखेरच्या षटकांमध्ये अचूक मारा करताना 21 धावा देऊन चार महत्त्वाच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तसेच, आपल्या संघाला एक थरारक विजय मिळवून दिला.
एमपीएल 2023 मध्ये नऊ असे गोलंदाज होते, ज्यांनी आपल्या स्पेलमध्ये तीन बळी मिळवले. त्यापैकी नाशिकच्या प्रशांत सोलंकी याने सर्वात कंजूस गोलंदाजी करताना फक्त 12 धावा देत तीन फलंदाजांना बाद केलेले. रत्नागिरीचा प्रदीप दाढे व पुणेरी बाप्पा संघाचा पियुष साळवी यांनी प्रत्येकी 18 धावा देताना तिघांना तंबूचा रस्ता दाखवलेला.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी देखील संपूर्ण स्पर्धा प्रेक्षकांसाठी विनामूल्य असेल. तसेच चाहते प्रथमच आयोजित होत असलेल्या WMPL ची देखील मेजवानी घेऊ शकतात. गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या दोन्ही स्पर्धा होतील. या स्पर्धा JioHotstar व Star Sports 2 येथे थेट प्रक्षेपित होणार आहेत. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 Tv Channel)
Comments are closed.