अर्धा पगार रोखीने, अर्धा ऑनलाइन; बेस्टच्या गोंधळाचा कर्मचाऱ्यांना मनस्ताप

बेस्ट उपक्रमामध्ये पगाराचा गोंधळ सुरू आहे. कर्मचारी, अधिकाऱयांना अर्धा पगार ऑनलाइन पद्धतीने बँक खात्यात, तर अर्धा पगार रोखीने दिला जात आहे. रोख रक्कम मिळवण्यासाठी कर्मचारी, अधिकाऱयांना दर महिन्याला मूळ आगारात खेटे मारावे लागत आहेत. हा मनस्ताप थांबवण्यासाठी योग्य नियोजन करून पूर्ण पगार कर्मचाऱयांच्या बँक खात्यात जमा करा, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेने केली आहे. तसे निवेदन पालिका आयुक्त व बेस्ट महाव्यवस्थापकांना निवेदन दिले आहे.

बेस्ट कर्मचाऱयांना पूर्वी पूर्ण पगार रोखीने दिला जायचा, मात्र मागील चार वर्षांत नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. वाहतूक व विद्युत पुरवठा विभागातून दररोज येणारी रोख रक्कम तशीच पडून राहत आहे. त्याचा फटका कर्मचाऱयांना बसला आहे. ‘सर्वत्र ऑनलाइन व्यवहाराला प्राधान्य दिले जात असताना बेस्ट प्रशासन अर्धा पगार रोखीने देऊन पाऊल मागे का टाकतेय,’ असा सवाल बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केला आहे.

अर्ध्या पगारावर कर्ज मिळेना!

मासिक पगार दोन तुकड्यांत देण्याच्या बेस्टच्या कारभारामुळे कर्मचाऱ्यांना बँकांकडून अपेक्षित कर्ज मिळवणे मुश्कील झाले आहे तर कर्ज घेतलेल्या कर्मचायांना कर्जाचा हप्ता भरण्यासाठी दर महिन्याला रोखीने घेतलेला पगार बँकेत जमा करावा लागत आहे.

Comments are closed.