मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून जगणार नाही, शपथ घ्या! उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्राला खणखणीत आवाहन

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्याने दिमाखदार प्रारंभ झाला. अवघे षण्मुखानंद सभागृह खच्चून भरले होते. याच गर्दीच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी मुंबई-महाराष्ट्र गिळायला निघालेल्या भाजपच्या दिल्लीश्वरांवर हल्ला चढवला. ‘मेलो तरी बेहत्तर, पण त्या दोन व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून जगणार नाही अशी शपथ घ्या’, असे खणखणीत आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबईत निकराने लढणाऱया शिवसैनिकांची उद्धव ठाकरे यांनी पाठ थोपटली आणि शिवसेनेला पालवी फुटलीय, चला नव्याने सुरुवात करूया, अशी साद घातली तेव्हा षण्मुखानंदमध्ये ‘जय महाराष्ट्र… जय भवानी…जय शिवाजी’ अशी गर्जना घुमली.

शिवसेनेने, बाळासाहेबांनी मुंबई-महाराष्ट्राला काय दिले हे विचारणाऱ्या गधडय़ांना सांगतो, बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचं कसं हे शिकवलं, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. जगायचं कसं हे आपण आज विसरत चाललो आहोत. पूर्वी गुलामगिरीत आपण राहत होतो तसं या दोन व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून आपल्या नशिबी जीणं येईल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

जीव वाचवणारा, जिवाचा सौदा करणारा कोण ते ओळखा

मुंबईकरांनी, आपण इतरत्रही सगळ्यांनी याचा विचार केला पाहिजे की, आपल्याला जपणारं कोण आहे, अडीअडचणीला धावून येणारा कोण आहे आणि आपल्या आयुष्याचा व्यापार करणारं कोण आहे? आपलं आयुष्य विकत घेणारा वेळेवरती धावून येऊन आपला जीव वाचवू शकतो का? जीव वाचवणारा कोण आहे आणि आपल्या जिवाचा सौदा करणारा कोण आहे याचा सगळय़ांनी एकदा विचार करायला हवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

कुऱहाडीचा दांडा गोतास काळ

खाणीचं कॉण्ट्रक्ट निघतं. तो कॉण्ट्रक्टर येतो आणि झाडाच्या मुळावरती घाव घालायला लागतो. कारण ते झाड त्याच्या मधे येतंय. ते झाड जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची खाण होऊ शकत नाही. मुळावरती घाव पडायला लागल्यानंतर त्या झाडावरचे पशूपक्षी थरारून उठतात तेव्हा त्या झाडाला किती वेदना होत असतील. त्यातले काही पक्षी त्या झाडाशी संवाद करतात. अरे, तुला खूप यातना होत असतील ना…तेव्हा झाड म्हणतं, अरे यातना होताहेत. जे घाव बसतात त्याच्या यातना नाहीत, पण हा जो कॉण्ट्रक्टर आहे, हा जो व्यापारी आलाय तो ज्या कुऱ्हाडीने माझ्या मुळावरती घाव घालतोय त्या कुऱहाडीचा दांडासुद्धा माझ्या लाकडापासून बनवला गेला आहे त्याचं मला जास्त दुःख होतंय, असे नमूद करत ‘कुऱहाडीचा दांडा गोतास काळ असतो. हे सगळे कुऱहाडीचे दांडे आपल्या मुळावरती घाव घालण्यासाठी हे दोन व्यापारी वापरत आहेत. आपल्याला राग येणार आहे की नाही’, असे उद्धव ठाकरे उद्गारताच सभागृहातून गद्दारांविरोधात संताप व्यक्त झाला.

…तर महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलला असता

महाराष्ट्राचा इतिहास बघितल्यास गद्दारी हा विषय काही आजचा नाही. गद्दारी पूर्वापार चालत आलेली आहे. तो आपल्याला शापच आहे. जेव्हा विजय अशक्य असतो तेव्हा आपला शत्रू गद्दारांची मदत घेत असतो. आणि आजवर भगव्याशी गद्दारी झाली नसती तर अतिशयोक्ती वाटेल, पण या महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलून दाखवला असता, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाकरे नाव पुसणे शक्य नाही

शिवसेनाप्रमुखांनी एवढं कर्तृत्व उभं केलंय की, ठाकरे नाव पुसायला अनेक जण इकडे उतरताहेत; पण अजून त्यांना नाव पुसणं शक्य झालेलं नाही, असं ते रसायन होतं आणि त्यांचे आम्ही वारसदार. त्याला घराणेशाही म्हणायचे तर म्हणा, मला त्या घराणेशाहीचा अभिमान आहे. ते माझं भाग्य आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी शिवसेना म्हणून आपला जन्म झाला आहे. महापालिकेत शिवसेनेचा निसटता पराभव झाला. इतर ठिकाणीही आता निवडणुका होत आहेत. निवडणुका जिंकण्याचे तंत्र भाजपने आणले आहे, पण आपण नव्याने सुरुवात करू, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांना केले. शिवसेनेला नवी पालवी फुटलेली आहे. पानगळ होणे गरजेचे असते. सडलेली पाने झडलीच पाहिजेत, ती सडेपर्यंत नवे काेंब फुटत नाहीत. सडलेल्या पानात जीव नाही, विकली गेलेली ती पानं भाजपवाल्यांनी त्यांच्या झाडावर फेविकोलने चिकटवली तरी ती झाडाला तरारी देऊ शकणार नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना हा पक्ष नाही तर विचार आहे, अंगार आहे

‘भाजपला असं वाटत असेल की शिवसेना ते संपवतील, मात्र शिवसेना ते कधीही संपवू शकणार नाहीत. कारण शिवसेना हा फक्त पक्ष नाही तर विचार आहे. शिवसेना हा अंगार आहे. शिवसेना ही अन्यायग्रस्तांच्या काळजात पेटलेली मशाल आहे’, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

शिवसेनेचा जन्म घरे पेटवण्यासाठी झालेला नाही तर घरातील चूल पेटवण्यासाठी झालेला आहे. एक गद्दार गेला असेल, पण एका गद्दाराची जागा चार निष्ठावतांनी घेतली हे आपल्याला येणाऱया काळात दाखवून द्यायचं आहे, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.

नाराजांवर टीका

उद्धव ठाकरे यांनी यावेळी निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन शिवसेना सोडून गेलेल्यांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, मुंबईत प्रत्येक वॉर्डात आजही एकापेक्षा एक सरस उमेदवार होते. महिला, पुरुष असे सगळेच होते. एका ठिकाणी एकालाच उमेदवारी देता येते. एका ठिकाणी दोन इच्छुक असले तर एक नाराज होतो. चार असले तर तीन नाराज होतात. काही ठिकाणी पाचपेक्षा जास्त उमेदवार होते. त्यावेळी माझ्या नेतृत्वाचा आणि शिवसैनिकांच्या निष्ठsचा कस लागतो. काहीजण नाराज झाले, पण दुसऱया दिवसापासून पुन्हा कामाला लागले, याला म्हणतात निष्ठा. काही जण नाराज झाले त्यांनी बंडखोरी केली. काही जणांना सर्व काही दिले तरी नाराज झाले असे उद्धव ठाकरे म्हणताच उपस्थितांमधून दगडू…दगडू…असा आवाज आला. मात्र आपण कुणाचेही नाव घेऊ इच्छित नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.

…तेव्हा वाईट वाटतं

शिवसेना लढाई लढत असते तेव्हा आपली माणसं विकली जातात हे पाहून वाईट वाटतं आणि या लढाईला काय अर्थ आहे की नाही असा प्रश्न पडतो. पण 100 पराभव झाले तरी एक मोठा विजय सुख देऊन जातो. शिवसेनेने सामान्य गृहिणीला नगरसेविका बनवले हे ऐकून अभिमान वाटतो, बाळासाहेबांचे शिवसैनिक जिवंत आहेत असे वाटते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

षण्मुखानंद सभागृहातील सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. सोहळ्याला रश्मी ठाकरे उपस्थित होत्या. व्यासपीठावर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, अनंत गीते, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार भास्कर जाधव, अॅड. अनिल परब, अंबादास दानवे, राजन विचारे, सुनील प्रभू उपस्थित होते.

किती कराल वार? आम्ही लयला घाबरणारी माणसं नाहीत. मराठय़ांचा इतिहास जेवरक्तरंजित आहे, कदाचितच तेवरक्तरंजित इतिहास आपल्या देशातच नाही, तर जगाच्या पाठीवर दुसऱ्या कुणाचा असेल. त्या रक्तरंजित इतिहासात जास्त वार गद्दारांनी केलेले आहेत याचंच शल्य आहे.

संपूर्ण महाराष्ट्र यांना पादाक्रांत करायचा आहे. महाराष्ट्र गिळायचा आहे. मुंबईत पैशाचा भरपूर वापर केला गेला. माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या. दार बंद होतं तिथे दाराच्या खालच्या फटीतून पैसे भरलेले लिफाफे फेकले गेले. विकत घेताय तुम्ही महाराष्ट्र? मत विकत घ्याल, पण मन कसं विकत घ्याल? जी जिवंत मनं आहेत ती आजसुद्धा माझ्या शिवसेनेसोबत आहेत हे मुंबईने परत दाखवून दिले. हीच आमची ताकद आहे.

सत्काराची शाल उद्धव ठाकरेंच्या गळ्यात घातली

राज ठाकरे यांचे भगवी शाल घालून उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. ही शाल राज यांनी उद्धव ठाकरे यांच्या गळय़ात घातली. हा क्षण तमाम शिवसैनिकांसाठी डोळय़ांत साठवून ठेवावा असाच होता. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी दोन्ही नेत्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

हरामखोर व्यापारी माझ्या डोळ्यासमोर मुंबईचे तुकडे तोडत असतील तर मी गप्प बसणार नाही. माझ्याकडे मूठभर निष्ठावंत असतील तरी त्यांना घेऊन त्या व्यापाऱ्यांच्या छाताडावर प्रहार केल्याशिवाय राहणार नाही. तिथे कुठलीही तडजोड होऊ शकत नाही.

शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांपेक्षा काकणभर जास्त प्रेम माझ्यावर करतात. कारण मी बाळासाहेबांचा मुलगा आहे. आदित्यवर जास्त प्रेम करतात. वादळात खेळत मी मोठा झालो आहे आणि तुमच्या सगळ्यांची जबाबदारी घेऊन मी पुजात आहे.

शिवसेनेशी गद्दारी करणाऱयांना किती पैसे मिळाले? 50 खोके ना. मग मीच जातो ना मला किती मिळणार? पण असं केलं तर मला शिवसेनाप्रमुखांचे, ठाकरेंचे नाव घेता येणार नाही. मी नालायक म्हणून या घराण्यामध्ये जन्माला आलो हा शिक्का मी कधी लागू देणार नाही.

भाजपवाल्यांना धडकी भरेल अशा आवाजात आजपासून ‘जय महाराष्ट्र’ बोला

भाजप हिंदुत्वाच्या आडून हळूवारपणे त्याची संस्कृती महाराष्ट्रावर लादतोय असे सांगत उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, हळुवारपणे हे आक्रमण सुरू आहे. हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न केला. मी मुख्यमंत्री असताना मंत्रालयातही सर्वजण फोन उचलताच जय महाराष्ट्र म्हणायचे. आज त्या जय महाराष्ट्रलाही धोका निर्माण झाला आहे. अनेक भगवे फडकायला लागले आहेत. वेगवेगळे उद्घोष सुरू झाले आहेत. लोकसभेच्या गाण्यातला जय भवानी जय शिवाजी शब्द कायला सांगत होते. का. हे कदापि मान्य नाही असे सांगत, जय भवानी, जय शिवाजी… जय महाराष्ट्र असे आजपासून जोरात बोलायला सुरूवात करा, इतक्या जोराने बोला की त्या आवाजाने समोरच्याच्या उरात धडकी भरली पाहिजे, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यावर सभागृहातही जय महाराष्ट्र…जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा घुमल्या.

पुन्हा शाखाभेटी सुरू करणार

निवडणुकीच्या काळात जशा शिवसेना शाखांना भेटी दिल्या तशा शाखाभेटी आपण पुन्हा सुरू करणार आहोत असे उद्धव ठाकरे म्हणाले. महानगरपालिका निवडणुकीत ज्या वॉर्डांमध्ये शिवसेनेला विजय मिळाला तेथील शाखांमध्ये तर जाणारच आहे, पण जिथे पराभव झाला तेथील शाखांमध्येही जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

Comments are closed.