भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात शिवसेना-मनसेचा धडक मोर्चा; निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत लढा, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात निर्धार

बोरिवली, दहिसरपासून अगदी गोरेगाव आणि पालघरपर्यंतच्या रुग्णांसाठी सोयीस्कर ठरणाऱया पालिकेच्या भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट भाजप सरकारने घातला आहे. यामुळे या ठिकाणी माफक दरात मिळणारे उपचार गोरगरीबांच्या आवाक्याबाहेर जाणार आहेत. याचा तीव्र निषेध करीत भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात आज शिवसेना-मनसेने रुग्णालयावर प्रचंड धडक मोर्चा काढला. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात काढलेल्या या मोर्चात खासगीकरणाचा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.

पालिकेने बोरीवली पश्चिम येथील श्री हरीलाल भगवती हॉस्पिटलची पुनर्रचना करून हे रुग्णालय 30 वर्षांच्या करारावर ‘सार्वजनिक-खासगी भागीदारी’ (पीपीई) मॉडेलअंतर्गत चालवण्याचा निर्णय घेऊन निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे. यामुळे सर्वसामान्य-गोरगरीबांच्या हक्काच्या आरोग्य सुविधांवर गदा येणार आहे. याविरोधात शिवसेना-मनसेने हे
‘जनआंदोलन’ केले. मोर्चासाठी प्रचंड संख्येने शिवसैनिक-मनसैनिक एकत्र आल्याने ‘शिवसेना-मनसे’ युतीचा विजय असो असा गगनभेदी नारा घुमला. यावेळी शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब, शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू, उपनेते विनोद घोसाळकर, माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख आणि आयोजक उदेश पाटेकर, विभागप्रमुख संतोष राणे, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, नगरसेवक अंकित प्रभू, नगरसेविका सारिका झोरे, विभाग संघटक शुभदा शिंदे, मनाली चौकीदार, शशिकांत झोरे, रश्मी गायकवाड, मनसेचे नेते संदीप देशपांडे, नयन कदम, रंजना नेवाळकर, कुणाल माईणकर, धनश्री कोलगे, सचिन खानविलकर, सचिन पाटील, धनश्री नाईक आदी उपस्थित होते.

भाजप सुरतेच्या लुटीचा सूड घेण्यासाठी महाराष्ट्र लुटतेय – आदित्य ठाकरे

भाजप भूखंडांपासून मैदाने, उद्याने, शाळा, पोर्ट, कॉलेज आणि हॉस्पिटलही बळकावून कंत्राटदार मित्रांच्या घशात घालत आहे. महाराष्ट्राचा सह्याद्रीही विकायला काढला आहे. भाजप सुरतेच्या लुटीचा बदला घेण्यासाठी महाराष्ट्र लुटतेय, असा घणाघात यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला. भाजपला सरकार चालवता येत नाही. कोणत्याही त्रुटी दाखवल्या की कारवाईची नोटीस बजावली जाते. यांचा ‘सबका मालिक एक’ म्हणजे ‘अदानी’ असल्याचा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.

Comments are closed.