11 वर्षाच्या मुलाने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव; भंडाऱ्यातील धक्कादायक प्रकार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात एका 11 वर्षीय शाळकरी मुलाने चक्क स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळेत झालेल्या एका वादाचे पर्यावसान थेट पालकांपर्यंत पोहोचणार असल्याने, शिक्षेच्या भीतीपोटी या मुलाने अपहरणा पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर संतापलेल्या मुलाने फळ्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. या प्रकारामुळे शिक्षकांनी मुलाच्या पालकांना शाळेत बोलावून घेतले, मात्र वडिलांना सामोरे जाण्याच्या भीतीमुळे या मुलाने अपहरणाचा बनाव रचला.

विशेष म्हणजे, सुरुवातीला या मुलाने निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी चक्क ‘एआय’ची (AI) मदत घेतली होती. ‘एआय’ने त्याला आपली चूक कबूल करण्याचा सल्ला दिला होता, मात्र शिक्षेच्या भीतीने त्याने तो धुडकावून लावला. त्यानंतर युट्युबवरील क्राईम स्टोरीज पाहून त्याने अपहरणाचा कट आखला. “एका अनोळखी व्यक्तीने चाकूचा धाक दाखवून माझे अपहरण केले, रुमालाने बेशुद्ध केले आणि नागपूरच्या दिशेने जात असताना उमरेडजवळ मी त्यांच्या तावडीतून सुटलो,” अशी खोटी माहिती त्याने फोनवरून आपल्या आईला दिली. मुलाच्या या फोनमुळे पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली होती.

मुलगा घरी परतल्यानंतर पालकांना सुरुवातीला मोठा दिलासा मिळाला, मात्र त्याने सांगितलेल्या घटनेत अनेक विसंगती आढळून आल्या. संशय बळावल्याने पालकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मुलाने सांगितलेली कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले. अखेर पालकांनी मुलाला प्रेमाने विश्वासात घेऊन विचारणा केली असता, त्याने भीतीपोटी हा सर्व बनाव रचल्याची कबुली दिली. या घटनेने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments are closed.