जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण; पाणीपुरवठा सुरळीत, 75 वर्षे जुनी पाइपलाइन नव्याने टाकली
भांडुप जलशुद्धीकरण केंद्रला पाणीपुरवठा करणारी 75 वर्षे जुनी जीर्ण झालेली जलवाहिनी नव्याने टाकण्याचे काम पालिकेकडून पूर्ण झाले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत असून सोमवार, मंगळवार मुंबईच्या 17 विभागांत करण्यात आलेली 15 टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.
पालिकेच्या माध्यमातून पाण्याची वहनक्षमता गमावलेल्या जलवाहिन्यांच्या बदलाची महत्त्वाकांक्षी मोहीम राबवली जात आहे. मोठय़ा व्यासाच्या नव्या जलवाहिन्या टप्प्याटप्प्याने बदलण्यात येत आहेत. यामुळे पाणीगळती, दूषित पाणीपुरवठा आणि रस्ते खचणे यांसारख्या दीर्घकालीन समस्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. या मोहिमेतील एक निर्णायक टप्पा म्हणून तानसा धरणातून भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी 2750 मिलिमीटर व्यासाची जीर्ण झालेली जलवाहिनीच्या बदलाची कार्यवाही आज दुपारी पूर्ण करण्यात आली आहे.
सलग 28 तास जोखमीचे काम
जीर्ण जलवाहिनी बदलण्याचे अत्यावश्यक काम सोमवार, 8 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू करण्यात आले. हे काम आज मंगळवारी दुपारी 2 वाजता पूर्ण झाले. या जोखमीच्या कामासाठी जल अभियंता विभागाने सलग 28 तास काम यशस्वीरीत्या पूर्ण केले.

Comments are closed.