…अखेर विकास भरत गोगावले महाड शहर पोलिसांना शरण

महाडमधील राड्या प्रकरणी महिनाभरापासून फरार असलेला कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा विकास गोगावले हा पोलिसांसमोर शरण आला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची अक्षरशः खरडपट्टी काढल्यानंतर विकास गोगावले महाड शहर पोलिसांसमोर हजर झाला.

महाड नगर परिषदेच्या मतदानाच्या दिवशी शिंदे गट आणि अजित पवार गटात तुफान हाणामारी झाली. याच प्रकरणात मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास व पुतण्या महेश यांच्यावर तसेच माजी आमदार माणिक जगताप यांचा मुलगा श्रीयांश जगताप यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर हे सगळे आरोपी फरार झाले. विकास गोगावले याने अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला. त्यावर गुरुवारी न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने राज्य सरकारसह पोलिसांचीही खरडपट्टी काढली. पोलीस रेकॉर्डनुसार फरार असलेल्या महेश गोगावले याने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती प्रतिवादी वकिलांनी न्यायालयाला दिली. त्यावरूनही न्यायालयाने सरकारची कानउघाडणी केली.

‘मंत्र्यांची मुलं गुन्हा करून मोकाट फिरतात. मंत्र्यांच्या संपर्कात असतात. पण पोलिसांना सापडत नाहीत. हे सगळं होऊनही मंत्री खुशाल मंत्रिमंडळात बसतात. सरकारने मनात आणले तर कोणत्याही व्यक्तीला 24 तासांत अटक केली जाऊ शकते; पण विकास गोगावले फरार होऊन महिना उलटला तरी त्याचा साधा ठावठिकाणी पोलिसांना लागत नाही. या राज्यात कायदा- सुव्यवस्था आहे की नाही?’ असा सवाल न्या. जामदार यांनी उपस्थित केला.

मुलगा फरार असताना गोगावले मंत्रिमंडळात कसे?

मुलगा फरार असताना एखादी व्यक्ती मंत्रिमंडळात कशी राहू शकते? आज मी वाचले की, हे मंत्रीमहोदय 26 जानेवारी रोजी ध्वजवंदन करणार आहेत. त्यांना हा मान का दिला जात आहे? हे सगळं राजकारण आहे, असा संताप न्या. माधव जामदार यांनी व्यक्त केला.

Comments are closed.