जागर – काळ्या पावसाची एवढी चर्चा का?
>> भावेश ब्राह्मणकर
अमेरिका, इस्रायल-इराण युद्धाने जगभरात भीतीचा गोळा निर्माण झाला आहे. त्यातच इराणच्या तेहरानमध्ये काळा पाऊस पडल्याने त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. त्याचे कारण काय?
विसाव्या आणि एकविसाव्या शतकातील युद्धे केवळ दोन देशांमधील लष्करी ताकद आजमावण्यापुरती मर्यादित राहिलेली नाहीत. आधुनिक युद्धतंत्रात शत्रूला जेरीस आणण्यासाठी आता केवळ मानवी जीवहानी केली जात नाही, तर त्या देशाचा आर्थिक आणि नैसर्गिक कणा मोडण्याचे काम केले जात आहे. इस्रायलने इराणच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पांवर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यांनंतर तेहरानमध्ये पडलेला ‘काळा विषारी पाऊस’ ही केवळ एक हवामानशास्त्राrय घटना नसून ती निसर्गावर झालेल्या क्रूर आक्रमणाची पोचपावती आहे.
गेल्या रविवारी इराणची राजधानी तेहरानच्या नागरिकांनी जे अनुभवले, ते कोणत्याही हॉलीवूडच्या थरारपटापेक्षा कमी नव्हते. आकाशातून पाण्याचे थेंब नव्हे, तर काळ्या रंगाचे, चिकट आणि दुर्गंधीयुक्त रसायन पडत होते. फोर्ब्स आणि इतर आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा ‘काळा पाऊस’ म्हणजे इस्रायली हल्ल्यात जळून खाक झालेल्या इराणच्या तेलसाठय़ांचा आणि रिफायनरींचा अवशेष होता. जेव्हा क्षेपणास्त्रs तेलसाठय़ांवर आदळतात, तेव्हा लाखो टन कच्च्या तेलाचे ज्वलन होते. यातून निर्माण होणारा प्रचंड काळा धूर, कार्बनचे कण आणि सल्फर डायऑक्साईडसारखी विषारी रसायने वातावरणात वरच्या थरापर्यंत पोहोचतात. पावसाच्या ढगांशी या कणांचा संयोग झाला की, तो पाऊस ‘काळा विषारी पाऊस’ म्हणून जमिनीवर येतो.
इराण हा जगातील महत्त्वाचा तेल उत्पादक देश आहे. इस्रायलने नेमके याच मर्मावर घाला घातला. इराणच्या अब्जावधी डॉलर्सच्या तेल मालमत्तेचे नुकसान तर झालेच, पण त्यातून निर्माण झालेला ‘ब्लॅक कार्बन’ आता संपूर्ण पश्चिम आशियाच्या वातावरणात पसरला आहे. जेव्हा तेल प्रकल्प जळतात तेव्हा त्यातून निघणारा धूर इतका दाट असतो की, तो सूर्याचे किरण जमिनीपर्यंत पोहोचू देत नाही. त्यामुळे स्थानिक तापमानात अचानक बदल होतात. या धुरामध्ये ‘हायड्रोकार्बन्स’चे प्रमाण सर्वाधिक असते. हे कण श्वासाद्वारे शरीरात गेल्याने श्वसनसंस्थेचे कायमस्वरूपी नुकसान होते. आजच्या काळात युद्धाला केवळ राजकीय परिप्रेक्ष्यातून न पाहता ‘इकोसाईड‘ या नजरेतून पाहण्याची गरज आहे. इकोसाईड म्हणजे पर्यावरणाची जाणीवपूर्वक केलेली व्यापक नासाडी. या हल्ल्यांमुळे होणारे नुकसान जाणून घेणे आवश्यक आहे.
जमिनीचे विषारीकरण – तेलसाठे फुटल्यामुळे हजारो गॅलन तेल शेतजमिनीत आणि मोकळ्या भूभागात पसरले आहे. कच्च्या तेलातील जड धातू जमिनीत मुरल्यामुळे ती जमीन पुढील अनेक दशके नापीक होते. त्याशिवाय जळालेल्या तेलातून तयार झालेली राख आणि रासायनिक अवशेष जमिनीवर साचतात. या घटकांमध्ये अनेकदा भारी धातू आणि विषारी संयुगे असतात. ही रसायने जमिनीत मिसळल्यास शेतीची सुपीकता कमी होते. इराणमध्ये पिकांचे उत्पादन घटून अन्न साखळीतही विषारी घटक प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती.
जलस्रोतांवरील संकट – इराण हा मुळातच पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेला देश आहे. येथील भूगर्भातील पाणी हेच शेती आणि पिण्यासाठी मुख्य आधार आहे. एकदा का भूजल साठे विषारी झाले की, ते शुद्ध करणे विज्ञानासाठीही मोठे आव्हान असते. या युद्धामुळे इराणच्या पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षेला मोठा सुरुंग लागला आहे.
सागरी जीवसृष्टीचा विनाश – इराणची किनारपट्टी आणि पर्शियन आखातातील जैवविविधता जागतिक स्तरावर महत्त्वाची आहे. तेल गळतीमुळे समुद्राच्या पृष्ठभागावर तेलाचा तवंग निर्माण होतो, ज्यामुळे पाण्यात ऑक्सिजन जाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मासे आणि इतर जलचर प्राण्यांचा मोठय़ा प्रमाणावर मृत्यू होतो. हे केवळ इराणचे नुकसान नसून संपूर्ण जागतिक सागरी पर्यावरणाचे नुकसान आहे.
मानवी आरोग्याला बाधा – युद्धामुळे निर्माण होणारे वायू प्रदूषण हा सर्वात मोठा पर्यावरणीय धोका ठरत आहे. तेलसाठे आणि औद्योगिक प्रकल्प जळल्यामुळे प्रचंड प्रमाणात धूर आणि विषारी वायू हवेत पसरतात. त्यामुळे हवेची गुणवत्ता अत्यंत धोकादायक पातळीवर जाते. अशा प्रदूषित हवेमुळे नागरिकांमध्ये श्वसनाचे आजार, अस्थमा, फुप्फुसांचे विकार आणि डोळ्यांच्या तक्रारी वाढू शकतात.
जैविक विविधतेची हानी – युद्धामुळे जैव विविधतेलाही धोका निर्माण होतो. हवाई हल्ले, आग आणि प्रदूषण यांमुळे अनेक प्राणी-पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होतात. काही प्रजाती दीर्घकाळासाठी त्या प्रदेशातून नष्ट होण्याचाही धोका निर्माण होतो. त्यामुळे संपूर्ण परिसंस्थेवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
जग आज ‘नेट झीरो’ आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या गप्पा मारत असताना ही युद्धे या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत. इराणमधील रिफायनरींच्या आगीतून निघालेला कार्बन हा जागतिक तापमान वाढीला हातभार लावणारा ठरणार आहे. दुर्दैवाने युद्धात होणाऱया मानवी मृत्यूंची गणना केली जाते, आर्थिक नुकसानीचे आकडे मोजले जातात, पण पर्यावरणाचे जे नुकसान होते त्याकडे जागतिक संघटनांचे दुर्लक्ष होते. जिनिव्हा कन्व्हेन्शननुसार, नैसर्गिक पर्यावरणाचे मोठय़ा प्रमाणावर आणि दीर्घकालीन नुकसान करणाऱया युद्धतंत्रावर बंदी आहे. मात्र, इराण-इस्रायल संघर्षात या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. इराणमधील ही घटना जगासाठी एक धोक्याची घंटा आहे. जर युद्धे अशीच निसर्गाला ओलीस धरून खेळली गेली तर भविष्यात जिंकणारा देशही नष्ट झालेल्या निसर्गामुळे हरलेलाच असेल. कारण विषारी झालेले पाणी आणि हवा शुद्ध करण्यासाठी निसर्गाला हजारो वर्षे लागतील.
इतिहासातही युद्धामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम झाल्याची उदाहरणे आहेत. 1991 मध्ये गल्फ युद्धाच्या वेळी कुवेतमधील तेल विहिरींना आग लावण्यात आली होती. त्या आगीतून निर्माण झालेल्या धुरामुळे अनेक महिन्यांपर्यंत वातावरण प्रदूषित झाले होते. त्या तुलनेत इराणमधील सध्याची परिस्थिती लहान असली तरी त्याचे परिणाम दीर्घकालीन असू शकतात. इराणमधील ‘काळा पाऊस’ हा केवळ इराणचा प्रश्न नाही. तेथील विषारी हवा वाऱयासोबत शेजारील देशांमध्येही जाईल. मानवाच्या सत्तेच्या आणि वर्चस्वाच्या हव्यासापोटी निसर्गाचा जो बळी दिला जात आहे, त्याचे परिणाम पुढील पिढय़ांना भोगावे लागणार आहेत.
(लेखक पर्यावरण अभ्यासक आणि मुक्त पत्रकार आहेत)
bhavbrahma@gmail.com
Comments are closed.