परिवहन मंत्र्यांनी एसटी आणल्या; वाहक -चालकांचे खाण्यापिण्याचे, झोपण्याचे हाल, भाईंदर डेपोमध्ये ना स्वच्छतागृह ना पिण्याच्या पाण्याची सोय

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरिता भाईंदर डेपोतून विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. मात्र या गाड्या चालवणारे एसटीचे वाहक व चालकांचे खाण्या-पिण्याचे तसेच झोपण्याचे हाल होत असून त्यांना प्रशासनाने वाऱ्यावर सोडले आहे. डेपोमध्ये ना दर्जेदार स्वच्छतागृह ना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय. या प्राथमिक गरजा तर सोडाच पण झोपण्याचीदेखील गैरसोय झाल्याने एसटीचे कर्मचारी संतापले आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना तर ऐन सणासुदीच्या काळात रस्त्यावरच रात्र काढावी लागली.

ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि मुंबई महानगर प्रदेशातील कोकणवासीयांना मोफत प्रवासाचे नियोजन एसटी महामंडळाने केले खरे. यासाठी सुमारे २ हजारहून अधिक एसटी गाड्यांची नोंदणी करण्यात आली. आजपासून या बस चाकरमान्यांना घेऊन कोकणात जाण्यासाठी रवाना झाल्या. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदार संघातील मीरा-भाईंदर, दहिसर ते जोगेश्वरीपर्यंतच्या गणेशोत्सवनिमित्ताने कोकणात जाण्यासाठी विशेष बसेस सोडण्यात आल्या. त्यासाठी कोकणातून मोठ्या संख्येने एसटी बसेस मागवल्या. मात्र त्या बसेसमधील चालक आणि वाहकांना स्वच्छतागृह, आरामाची व्यवस्था नसल्याने त्यांचे पुरते हाल झाल्याचे दिसून आले.

प्रवासात अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी घेणार का?

या ढिसाळ नियोजनावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि काँग्रेस पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. प्रवासादरम्यान बसेसच्या कर्मचाऱ्यांना काही झाल्यास आणि प्रवाशांना कोणता धोका उद्भवल्यास याची जबाबदारी परिवहन मंत्री घेणार का? तसेच प्रवासात काही अनुचित प्रकार घडल्यास याला सर्वस्वी जबाबदार परिवहन मंत्री राहणार असा आरोप प्रवाशांनी केला आहे.

कर्मचाऱ्यांची अवस्था बघा!

ठाण्याच्या खोपट एसटी डेपोमध्ये बसमध्ये डिझेलची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेस डिझेल भरून सुमारे ८ ते ९ तास प्रवास करून चालकांना मीरा रोड गाठावे लागले. याप्रकरणी युवक काँग्रेसचे पदाधिकारी सिद्देश राणे यांनी परिवहन मंत्री यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. ‘सरनाईक बाहेर या आणि आपल्या कर्मचाऱ्यांची अवस्था बघा’ अशा शब्दात राणे यांनी संताप व्यक्त केला.

मंत्र्यांचा फक्त दिखावा

परिवहन मंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. असला प्रकार खपवून घेणार नाही. एसटी बस ज्या भागातील भाविकांसाठी बुक केल्या होत्या त्याच भागात बसेसच्या पार्किंगची सोय केली पाहिजे होती. तसेच कर्मचाऱ्यांची राहण्याची, जेवणाची सोय, सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपलीच असल्याचे सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. मात्र परिवहन मंत्र्यांचा फक्त दिखावा असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

Comments are closed.