Padma Award 2026: पालघरच्या दुर्गम भागातील तारपा वादक भिकल्या धिंडा यांना ‘पद्मश्री’; झोपडीत घुमला आनंदाचा स्वर

केंद्र सरकारने २०२६ सालासाठीच्या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून, यामध्ये महाराष्ट्रातील ४ दिग्गज मान्यवरांचा गौरव करण्यात आला आहे. शेती, वैद्यकीय आणि लोककला यांसोबतच आदिवासी संस्कृतीचा श्वास असलेल्या वारली संगीतालाही यंदा सन्मान मिळाला आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम वाळवंडा गावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
आजोबांची शिदोरी आणि गुरंढोरांची सोबत
पद्मश्री जाहीर झाल्याचे समजताच भिकल्या धिंडा यांनी आपल्या झोपडीत तारपा वाजवून आनंद व्यक्त केला. आपल्या प्रवासाविषयी सांगताना ते म्हणाले, “ही कला मला माझे आजोबा पिंजोबा यांच्याकडून वारसाहक्काने मिळाली आहे. लहानपणी जेव्हा मी गुरंढोरं चरायला घेऊन जायचो, तेव्हाच मला तारपा बनवण्याचा आणि तो वाजवण्याचा छंद लागला.” तोच छंद आज त्यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानापर्यंत घेऊन गेला आहे.
संस्कृती संवर्धनाचा वसा
आजच्या धावपळीच्या आणि मोबाईलच्या युगात आदिवासी संस्कृती मागे पडत असताना, भिकल्या धिंडा यांनी ही कला केवळ स्वतःपुरती मर्यादित ठेवली नाही. त्यांनी अनेक तरुणांना तारपा वादन शिकवून ही परंपरा जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. विशेष म्हणजे, ते स्वतः ही वाद्ये तयार करण्यातही निष्णात आहेत.
गरिबाच्या झोपडीत आनंदाचा उत्सव
पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर भिकल्या धिंडा आणि त्यांच्या पत्नीच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहणाऱ्या या कलावंताच्या कलेची दखल थेट केंद्र सरकारने घेतल्याने संपूर्ण पालघर जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्रातून यंदा वैद्यकीय, शेती आणि लोकनाट्य तमाशा क्षेत्रातील मान्यवरांचाही गौरव करण्यात आला आहे.

Comments are closed.