भिवंडी हादरली! अज्ञात महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत सापडला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Thane Crime: भिवंडी शहर हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इदगाह रोड परिसरातील खाडीत एका अज्ञात महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत सापडला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इदगाह रोड परिसरातील खाडीत शुक्रवारी सकाळी स्थानिक नागरिकांना पाण्यावर तरंगत असलेली वस्तू दिसली. जवळ जाऊन पाहिल्यानंतर ती वस्तू एका महिलेचे धड नसलेले शिर असल्याचे समोर आले. याची माहिती तात्काळ पोलीसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू केला.
महिलेची ओळख पटली नाही
या महिलेचे वय साधारण 25 ते 26 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप तिची ओळख पटलेली नाही. तिच्या अंगावरील कपडे अथवा दागिने यामुळेही ओळख पटवणे शक्य झालेले नाही. महिलेच्या शिराला सहविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.महिलेचं शीर नेमकी कुठून आलं? महिलेची हत्या कुठे झाली? मृतदेहाचा उर्वरित भाग कुठे आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. पोलीस विविध अंगांनी तपास करत असून, आसपासच्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या हरवलेल्या महिलांच्या नोंदींची छाननी केली जात आहे. तसेच खाडीजवळील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचाही प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
महिलेचा शिरच्छेद केलेला मृतदेह सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. हा प्रकार ऐकून अनेकांच्या अंगावर शहारे आले. भिवंडी शहरात यापूर्वीही काही वेळा खूनाच्या घटना घडल्या असल्या तरी अशा प्रकारे महिलेचा शिरच्छेद झालेला मृतदेह सापडल्याने लोकांमध्ये भीती व अस्वस्थता पसरली आहे.
पोलिसांची पुढील कार्यवाही
पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, गुन्हे शाखेचे पथकही तपासासाठी घटनास्थळी दाखल झाले आहे. ही हत्या कुणी व कोणत्या कारणासाठी केली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकांनी जाळे पसरवले आहे.या घटनेमुळे भिवंडी शहरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांचा तपास लागोपाठ सुरू आहे. महिलेची ओळख पटविणे आणि आरोपींना गजाआड करणे हे पोलीसांसमोरील मोठे आव्हान ठरले आहे.
Comments are closed.