नाना शंकरशेट यांच्या वडाळा येथील स्मारकाचे दिमाखदार भूमिपूजन; अभ्यासिका व ग्रंथालय ठरणार विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्रोत

मुंबईचे आद्य शिल्पकार, थोर समाजसुधारक, शिक्षण महर्षी आणि हिंदुस्थानी रेल्वेचे जनक नामदार नाना शंकरशेट यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज मोठय़ा दिमाखात पार पडला. विद्यार्थी व अभ्यासकांसाठी हे स्मारक प्रेरणास्रोत ठरणार असून येथून घडलेले आयएएस, आयपीएस देशाची मान अभिमानाने उंचावतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

वडाळा दोस्ती एकर येथे हे स्मारक उभे राहत आहे. नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्रभाऊ शंकरशेट यांच्या हस्ते कुदळ मारून स्मारकाची पायाभरणी करण्यात आली. तर दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण झाले. प्रतिष्ठानचे सरचिटणीस अॅड. मनमोहन चोणकर यांनी स्मारकासाठी भूखंड मिळविण्यापासून ते भूमिपूजनापर्यंत प्रतिष्ठानला कराव्या लागलेल्या संघर्षाची माहिती दिली.

नानांच्या स्मारकात स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, अद्ययावत अभ्यासिका, जगातील सर्वोत्तम पुस्तके असणारे ग्रंथालय असेल, असे सांगतानाच स्मारकात संस्कृत भाषा अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहे. डॉ. रत्नपारखी यांनी नानांचे स्मारक देश पातळीवर आदर्शवत ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तर हरेश आमडेकर यांनी संस्कृतमधून स्मारक उभारणीसाठी शुभेच्छा दिल्या. देश पातळीवर आदर्शवत बनेल असे स्मारक साकारू असा निर्धारही यावेळी करण्यात आला.

प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिनकर बायकेरीकर, कोषाध्यक्ष चंद्रशेखर दाभोळकर, दैसपचे उपाध्यक्ष डॉ. आनंद पेडणेकर, सूर्यकांत कल्याणकर, डॉ. विवेक रायकर, रवींद्र माहीमकर, मेहेंदळे असोसिएट्सचे जयेश मालणकर, अश्विन उपाध्याय, अॅड. सच्चिदानंद हाटकर, दिलीप मालंडकर, ठेकेदार कांतीशेट, शपंरशेट कुटुंबीय उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांच्याविषयी कृतज्ञता

नानांच्या स्मारकासाठी शिवसेनेमुळेच भूखंड मिळाला आणि नानांच्या कार्याविषयी कृतज्ञता म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अवघ्या एक रुपया दराने हा भूखंड प्रतिष्ठानला मिळवून दिला, अशी कृतज्ञता अॅड. मनमोहन चोणकर यांनी व्यक्त केली. यावेळी स्मारक उभारणीच्या आर्थिक मदतीसाठी क्यूआर कोडचे अनावरणही करण्यात आले.

Comments are closed.