बोरघाट बनला मृत्यूचा घाट, खोपोली बायपास ते ढेकू फूडमॉलपर्यंतचा रस्ता डेंजर स्पॉट

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील बोरघाट आता ‘मृत्यूचा घाट’ बनला आहे. अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून खोपोली बायपास ते ढेकू फूडमॉलपर्यंतचा तीन किलोमीटरचा रस्ता डेंजर स्पॉट असल्याचे आढळून आले आहे. या रस्त्यावर वर्षभरात 16 अपघात झाले असून 12 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर 60 वाहनांचे अतोनात नुकसान झाले. अपघातामुळे 61 जण जायबंदी झाले असून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा सुसाट प्रवास नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
खोपोली बायपास ते ढेकू या दरम्यान तीव्र उतार असल्याने वाहनांचे ब्रेक फेल होतात. ही वाहने पुढील गाड्यांवर आदळून आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. कार, बस, टेम्पो यासारख्या वाहनांचा चक्काचूर होऊन निष्पाप प्रवाशांचे प्राण गेले असून या अपघातांच्या जागांवर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. बोरघाटातील तीव्र उतार जीवघेणे ठरले असून भाताण बोगदादेखील ‘डेंजर झोन’ बनला आहे.
अपघातांचा पंचनामा
24 मे – ढेकू गावाच्या हद्दीत ब्रेक फेल झालेला कंटेनर काळ बनून आला आणि सात वाहनांना चिरडले.
1 मे कंटेनरने टेम्पोला दिलेल्या धडकेत एक ठार.
21 एप्रिल बॅटरी पॉइंटजवळ पर्यटकांच्या इनोव्हा गाडीला झालेल्या अपघातात तीन ठार.
16 जानेवारी – अमृतांजन पुलाजवळ कंटेनर उलटून तीन जखमी.
उतारावर होतो ब्रेक फेल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अवजड वाहने लोणावळा, खंडाळा येथून बोरघाटातील उतारावरून जात असताना चालकांना सारखा ब्रेक मारावा लागतो. तब्बल दहा-बारा किलोमीटरचे हे अंतर असल्याने वाहनांचे लायनर अतिशय गरम होतात. त्यामुळेच ब्रेक फेल होत असल्याचे दिसून आले आहे. अमृतांजन पुलाजवळ टाटा नऊ नंबर येथे ट्रक टर्मिनल उभारून तेथे लायनर थंड करण्याची व्यवस्था निर्माण करावी अशी सूचना रुग्णवाहिका चालवणारे व अपघाताच्या वेळी मदतीला धावणारे संजय म्हात्रे यांनी केली आहे. उतारांवरून गाड्या चालवताना वाहनचालकांच्या मनात अनेकदा गोंधळ निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले
बोरघाटातील अमृतांजन पूल ते फूडमॉल या 15 किलोमीटर अंतरावर स्कॅनर बसवण्यात आले आहेत. या स्कॅनरला मोबाईल टच करताच अपघातग्रस्तांना मदत उपलब्ध होईल.
एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास तिथे लगेच मदत मिळणे शक्य होणार आहे. तहसील कार्यालय, पोलीस, रुग्णवाहिका, रुग्णालय, सामाजिक कार्यकर्ते यांची नावे व नंबर लगेच मिळणार आहेत.
बोरघाटात 21 ठिकाणी तर खालापूर तालुक्यात 75 असे एकूण 96 स्कॅनर्स बसवले असल्याची माहिती तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिली.
Comments are closed.