Bhujbal suggests tunnel option near GMRT
मुंबई । नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा शिर्डी मार्गे करण्यास राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला असून हा या मार्गाचे संरेखन सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर आणि चाकण मार्गेच होण्यास पूर्व शर्त करावी, अशी स्पष्ट मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) च्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे हा प्रकल्प रखडला असून यामुळे नाशिकच्या औद्योगिक विकासाला खिळ बसणार आहे. याकरीता बुलेट ट्रेनच्या धर्तीवर जीएमआरटी जवळ बोगदा उभारावा अशी मागणीही त्यांनी या पत्राव्दारे केली आहे.
रेल्वे मंत्रालयाने सादर केलेल्या नव्या संरेखन प्रस्तावात पुणे-अहिल्यानगर-साईनगर शिर्डी मार्गाने ८० कि.मी. वळसा घालण्यात आला असून, तो तातडीने फेटाळावा, असे भुजबळ यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत वाढवण पोर्टसाठी थेट कनेक्टिव्हिटी मिळवण्यासाठी पुणे-नाशिक मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. या नव्या मार्गाने पुणे-नाशिक औद्योगिक पट्ट्यातील माल आणि प्रवासी वाहतुकीवर विपरीत परिणाम होणार असून, महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक धोरणाला बाधा पोहोचेल, असेही त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकशास्त्र केंद्राच्या आडमुठ्या भूमिकेमुळे संरेखन बदलण्यात आले असले तरी, बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या धर्तीवर GMRT परिसरात भूमिगत बोगदा बांधून पर्याय सुचवण्यात आला आहे. तरीदेखील जीएमआरटी कडून कोणताही ठोस प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही.
रेल्वे मंत्रालयाने हा प्रकल्प महारेल ऐवजी मध्य रेल्वे मार्फत राबवण्याचे संकेत दिल्याचेही भुजबळ यांनी निदर्शनास आणून दिले. यामुळे राज्य सरकारच्या ५०% आर्थिक सहभागासह सध्याचा नियोजनबद्ध आणि मर्यादित खर्चाचा आराखडा धोक्यात येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने महारेलच्या माध्यमातून जीएमआरटी परिसरात बोगदा बांधण्याची अट घालूनच प्रकल्पाचा अंतिम आराखडा मंजूर करावा, हीच महाराष्ट्राच्या हिताची दिशा ठरेल, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
काय आहे अडचण
ट्रेनवरील पेंटोग्राफ उपकरण ओव्हरहेड हाय-टेन्शन पॉवर लाईन्समधून वीज ट्रान्स्फर करते जे ट्रेन चालू असताना लाईन्सशी संपर्क साधते आणि तोडते. या घर्षणामुळे खूप मजबूत रेडिओ हस्तक्षेप होतो जो जीएमआरटी ज्या फ्रिक्वेन्सीवर चालते त्या सर्व फ्रिक्वेन्सीज व्यापतो. रेल्वे हे १८०० मेगाहर्ट्झ किंवा त्याहून अधिक फ्रिक्वेन्सीवर हलवण्याची मागणी जीएमआरटी ने केली आहे. रेल्वे मार्ग आणि गाड्यांचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी संप्रेषण उपकरणांद्वारे वापरली जाणारी फ्रीक्वेन्सी जीएमआरटीच्या समान फ्रीक्वेन्सी श्रेणीत येते. यामुळे वेधशाळेतील डेटा पूर्णपणे निरूपयोगी होण्याची भीती शास्त्रांनी व्यक्त केली असल्याचे म्हटले आहे.
Comments are closed.