ईशान किशनपूर्वी ‘या’ 10 दिग्गज खेळाडूंनी भूषवलंय SRH चं कर्णधारपद; पाहा किती भारतीय खेळाडूंचा समावेश?

इंडियन प्रीमियर लीग 2026 चा काऊंटडाऊन सुरू झाला असून 28 मार्चपासून आयपीएलच्या 19 व्या हंगामाला सुरुवात होत आहे. सर्व संघांनी कंबर कसली असून तयारीला वेग आला आहे. याच दरम्यान सनरायझर्स हैदराबादने (SRH) एक मोठी घोषणा केली आहे. पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) जागी आता ईशान किशन (Ishaan kishan) संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे आयपीएल 2026 च्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने ईशान किशनवर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. तसेच, धडाकेबाज सलामीवीर अभिषेक शर्माची (Abhishek Sharma) उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट करत संघाने माहिती दिली की, जोपर्यंत पॅट कमिन्स पूर्णपणे बरा होत नाही, तोपर्यंत ईशान किशन कर्णधारपदाचा कार्यभार सांभाळेल.

ईशान किशन गेल्या वर्षी SRH मध्ये सामील झाला होता. आयपीएल 2025 च्या लिलावात हैदराबादने त्याला 11.40 कोटी रुपयांना विकत घेतले होते. केवळ एक हंगाम संघात राहिल्यानंतर ईशानला कर्णधार बनवण्यात आले आहे. इशान हा SRH चा 11 वा कर्णधार ठरेल. विशेष म्हणजे, या संघाचे नेतृत्व करणारा तो चौथा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी कुमार संगकारा, शिखर धवन, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन यांसारख्या 10 दिग्गजांनी या संघाचे कर्णधारपद भूषवले आहे.

2013 मध्ये सनरायझर्स हैदराबादचे आयपीएलमध्ये पदार्पण झाले. तेव्हापासून आतापर्यंत संघाने 11 कर्णधार पाहिले आहेत. 2013 मध्ये कुमार संगकारा आणि कॅमेरून व्हाईट यांनी नेतृत्व केले. 2013-14 दरम्यान शिखर धवनने 16 सामन्यांत नेतृत्व केले. 2014 मध्ये डॅरेन सॅमी 4 सामन्यांसाठी कर्णधार होता. 2015 मध्ये डेव्हिड वॉर्नरच्या रूपात संघाला सर्वात यशस्वी कर्णधार मिळाला. 2016 मध्ये त्याने संघाला विजेतेपद मिळवून दिले. वॉर्नरने 2021 पर्यंत 67 सामन्यांत नेतृत्व केले.

केन विल्यमसनने 2018 ते 2022 दरम्यान 42 सामन्यांत कमान सांभाळली. याच काळात भुवनेश्वर कुमारनेही काही सामन्यांत नेतृत्व केले. मनिष पांडेने 2021 मध्ये एका सामन्यात नेतृत्व केले होते. 2023 मध्ये एडन मारक्रम आणि 2024 पासून पॅट कमिन्सकडे नेतृत्व होते. आता 2026 मध्ये ईशान किशन काही सामन्यांसाठी ही धुरा सांभाळताना दिसेल.

Comments are closed.