टी20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का! स्टार गोलंदाज संपूर्ण स्पर्धेतून बाहेर होण्याची शक्यता

टी-20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघासाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीचे (Shaheen Afridi) विश्वचषकात खेळणे आता कठीण झाले आहे. ऑस्ट्रेलियातील ‘बिग बॅश लीग’मध्ये क्षेत्ररक्षण करताना तो गंभीर जखमी झाला, ज्यामुळे त्याला ही स्पर्धा अर्धवट सोडावी लागली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शाहीनला उपचारांसाठी तातडीने पाकिस्तानला बोलावले आहे. विशेष म्हणजे, शाहीनच्या त्याच गुडघ्याला पुन्हा दुखापत झाली आहे ज्यावर काही वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. सध्या त्याला लाहोरमधील ‘हाय परफॉर्मन्स सेंटर’मध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

टी-20 वर्ल्ड कप 7 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. जर शाहीन या वेळेपर्यंत बरा झाला नाही, तर पाकिस्तानसाठी हा खूप मोठा धक्का असेल. स्वतः शाहीनने देखील पूर्ण मोसम खेळू न शकल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मात्र, तो मैदानात कधी परतणार हे पुढील वैद्यकीय चाचण्यांनंतरच स्पष्ट होईल.

यावेळच्या बिग बॅश लीगमध्ये शाहीनला फारशी चमक दाखवता आली नाही. ‘ब्रिस्बेन हीट’कडून खेळताना 4 सामन्यांत त्याला फक्त 2 बळी घेता आले. इतकेच नाही तर त्याने 11.19 च्या इकॉनॉमीने खूप धावा खर्च केल्या. दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठीही त्याला संघात स्थान देण्यात आलेले नाही.

Comments are closed.