राज ठाकरेंना कोकणात मोठा धक्का; मनसेचा खंदा शिलेदार साथ सोडणार? पक्षस्थापनेपासून सोबत पण…
MNS: कोकणातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चेबांधणीला गती दिली आहे. याच रणनीतीअंतर्गत चिपळूणचे उद्योजक प्रशांत यादव यांना नुकताच भाजप प्रवेश देण्यात आला. यादव हे पूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे विश्वासू मानले जात होते तसेच त्यांनी आमदार शेखर निकम यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. आता भाजपने दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून, या पार्श्वभूमीवर मनसेलाही कोकणात धक्का देण्याची तयारी सुरू आहे. मनसेचे कोकण संघटक व राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याच्या चर्चा सध्या खुलेआम रंगल्या आहेत. त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरल्याची माहिती असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच संपर्क मंत्री नितेश राणे यांच्याकडून यासाठी थेट प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातं आहे.
वैभव खेडेकर हे राज ठाकरे यांचे कोकणातील प्रमुख शिलेदार असून, 2014 मध्ये त्यांनी दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. खेड नगरपरिषद निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा असून ते नगराध्यक्षपदावरही राहिले आहेत. आंदोलनातून थेट भिडणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. युवा वर्गात त्यांची चांगली पकड आहे. त्यामुळे खेडेकर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्यास मनसेला रत्नागिरी जिल्ह्यात मोठा धक्का बसू शकतो. दरम्यान, खेडेकर यांनी या चर्चांना दुजोरा न देता “असं काही असेल, तर पत्रकार परिषद घेऊन स्वतः जाहीर करेन” असं स्पष्ट केलं आहे. मात्र त्यांच्या बालेकिल्ल्यातच भाजप प्रवेशाबाबत चर्चा जोमात सुरू असून, निकटवर्तीय कार्यकर्तेही हा प्रवेश गणेशोत्सवानंतर होणार असल्याचं सांगत आहेत.
वैभव खेडेकर काही दिवसांपासून पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा होती. याच दरम्यान त्यांना शिवसेनेत पक्षप्रवेशाची ऑफरही देण्यात आली होती. त्यानंतर खेडेकर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता त्यांना भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे. यासाठी खेडेकर यांच्या भाजपच्या नेत्यांजवळ भेटीगाठी, बैठकाही झाल्याच्या चर्चा आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशासाठी थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मंत्री, भाजपाचे जिल्हा संपर्क मंत्री नितेश राणे यांनी लक्ष घातल्याची माहिती आहे. त्यामुळे असं झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच कोकणात मनसेला मोठा धक्का बसणार आहे. भाजपने आगामी निवडणुकीसाठी मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत.
वैभव खेडेकर कोण?
वैभव खेडेकर हे राज ठाकरे यांचे कोकणातील महत्त्वाचे आणि गेल्या 20 वर्षांपासूनचे शिलेदार मानले जातात. त्यांनी 2014 मध्ये वैभव खेडेकर यांनी दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. राज ठाकरेंनी मनसे स्थापन केल्यापासून ते त्यांच्याबरोबर आहेत. इतकंच नाही तर खेड नगरपरिषद निवडून आणण्यात वैभव खेडेकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. ते यापूर्वी खेडचे नगराध्यक्ष होते. यापूर्वी त्यांचा थेट सामना शिवसेना नेते रामदास कदम यांच्यासोबत राहिला होता, पण अलिकडे हा संघर्ष कमी झाला आहे. युवा वर्गामध्येही वैभव खेडेकर यांची क्रेझ आहे. वैभव खेडेकर यांच्यावर आता सद्यस्थितीत मनसेच्या राज्य सरचिटणीस, कोकण संघटकपदाची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे वैभव खेडेकर यांनी पक्षाला रामराम ठोकल्यास मनसेला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, वैभव खेडेकर यांनाी सध्या या चर्चांवर नकार दिला असून असं काही असेल, तर मी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करेन, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र वैभव खेडेकर यांच्या खेड येथील बालेकिल्लातच त्यांच्या भाजप प्रवेशाची खुलेआम चर्चा सुरू आहे. इतकंच नाही तर त्यांचेच निकटवर्तीय कार्यकर्ते खाजगीत हा प्रवेश जवळपास निश्चित झाल्याचं सांगत गणेशोत्सवानंतर हा प्रवेश होईल अशी चर्चा आहे.
आणखी वाचा
Comments are closed.