2027 वर्ल्डकप आधी विराट-रोहित समोर मोठे आव्हान, गौतम गंभीर यांनी केले मोठे विधान

2027 च्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळतील का, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अडीच वर्षांनंतर हा मोठा स्पर्धात्मक सोहळा होणार आहे. रोहित-विराट सध्या त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहेत. रोहित शर्मा आता वनडे संघाचा कर्णधार नाही आणि शुबमन गिलला संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. एका अहवालानुसार, आता रोहित-विराट यांना केवळ त्यांच्या कामगिरीच्या आधारेच संघात स्थान मिळेल. अनेक दिग्गजांचे मत आहे की हे दोघे कदाचित पुढचा वर्ल्डकप खेळू शकणार नाहीत. आता गौतम गंभीर यांनी रोहित-विराटच्या भविष्यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.

वेस्टइंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या समाप्तीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीर उपस्थित होते. त्यावेळी मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहली 2027 चा वर्ल्डकप खेळतील का, असा प्रश्न विचारण्यात आला. गंभीर यांनी दोघांची प्रशंसा केली आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा उल्लेख केला. त्यांनी हे स्पष्ट केले की या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी ऑस्ट्रेलिया दौर्‍यात चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. गंभीर म्हणाले, “2027 चा वर्ल्डकप अडीच वर्षांवर आहे. सध्या वर्तमानात राहणे महत्त्वाचे आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही दर्जेदार खेळाडू आहेत. आशा आहे की दोघांचाही ऑस्ट्रेलिया दौरा संस्मरणीय ठरेल.”

पत्रकार परिषदेदरम्यान गौतम गंभीर यांचा हर्षित राणाच्या टीकाकारांवरही रोष व्यक्त झाला. त्यांनी म्हटले, “23 वर्षांच्या मुलाला लक्ष्य करणे ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. हर्षितचा वडील कोणतेही माजी चेअरमन नाहीत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला मुद्दाम लक्ष्य करणे योग्य नाही. सोशल मीडियावर ट्रोल करणे चुकीचे आहे आणि त्याचा मानसिक परिणाम काय होऊ शकतो, हे तुम्ही समजू शकता. टीम इंडिया क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करावी, ही देखील आपली जबाबदारी आहे. स्वतःचा यूट्यूब चॅनेल चालवण्यासाठी काहीही बोलणे योग्य नाही. जर तुम्हाला लक्ष्य करायचेच असेल, तर मला करा. मी ती गोष्ट हाताळू शकतो. त्या मुलाला एकटं सोडून द्या, आणि हे सर्व तरुण खेळाडूंसाठी लागू आहे.”

Comments are closed.