पाचव्या टेस्टसाठी इंग्लंडच्या संघात मोठा बदल, या खेळाडूला केले संघात सामील
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) भारताविरुद्ध अँडरसन-तेंडुलकर मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या टेस्टसाठी संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडने संघात एक बदल केला असून जेमी ओव्हरटनला संघात समाविष्ट करण्यात आले आहे. पाचवा टेस्ट सामना 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान ‘द ओव्हल’ येथे खेळवला जाणार आहे.
इंग्लंड क्रिकेट संघ 5 सामन्यांच्या टेस्ट मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. शेवटचा सामना जिंकून किंवा ड्रॉ खेळून इंग्लंड ही मालिका आपल्या नावावर करू शकतो, तर टीम इंडियाला मालिका बरोबरीत संपवायची असल्यास पाचवा टेस्ट सामना जिंकणे अत्यावश्यक आहे. सोमवारी ईसीबीने शेवटच्या टेस्टसाठी संघाची घोषणा केली, ज्यामध्ये मागील आठवड्यात सरे क्लबकडून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळणाऱ्या जेमी ओव्हरटनचा समावेश करण्यात आला आहे.
31 वर्षीय जेमी ओव्हरटन हा एक गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत खेळलेल्या एकमेव टेस्ट सामन्यात 2 विकेट्स घेतल्या होत्या, जो सामना 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झाला होता. जर तो पाचव्या टेस्टच्या प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट झाला, तर तो तीन वर्षांनंतर आपला दुसरा टेस्ट सामना खेळेल. याशिवाय, त्याने इंग्लंडसाठी 6 वनडे आणि 12 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्यात त्याच्या नावावर अनुक्रमे 7 आणि 11 विकेट्स आहेत.
चौथ्या टेस्टमध्ये दुखापत झालेला रिषभ पंत पाचव्या टेस्टमधून बाहेर पडला आहे. त्याच्या उजव्या पायावरील बूटावर क्रिस वोक्सने टाकलेली एक यॉर्कर लागली होती, त्यानंतर स्कॅनमध्ये त्याला फ्रॅक्चर झाल्याची पुष्टी झाली आहे. मात्र, पंतने दुसऱ्या दिवशी धाडसाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि अर्धशतक झळकावले. पंत पाचव्या टेस्टसाठी अनुपलब्ध असल्याने, बीसीसीआयने त्याच्या जागी नारायण जगदीशनला संघात सामाविष्ट केले आहे.
Comments are closed.