चिनी सैन्यासाठी मोठे संकट

युद्ध लढण्याची क्षमताच  कमकुवत : अहवालाचा दावा

वृत्तसंस्था/ बीजिंग

चिनी सैन्यावर मोठे संकट घोंगावत आहे. अलिकडेच समोर आलेल्या काही अहवालांमध्ये चिनी सैन्यावरून धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. यानुसार चीनच्या सैन्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचारविरोधी कारवाईमुळे त्याची सैन्य कमांड व्यवस्था प्रभावित झाली असून यामुळे त्याच्या वेगाने आधुनिक होत असलेल्या सैन्य शक्तीची तयारी विस्कळीत झाली आहे.

हा दावा लंडन येथील इंटरनॅशनल इन्स्टीट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजने (आयआयएसएस) स्वत:चा वार्षिक अहवाल ‘मिलिट्री बॅलेन्स’मध्ये केला आहे. अहवालानुसार व्यापक चौकशीमुळे पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) वरिष्ठ स्तरावर गंभीर त्रुटी निर्माण झाल्या आहेत. जोपर्यंत रिक्त पदे भरली जात नाही तोवर संघटनात्मक स्तरावर समस्या कायम राहणार आहे.

चीनच्या सैन्यामधील अंतर्गत कारवाई

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या कारवाईमुळे सेंट्रल मिलिट्री कमिशन, क्षेत्रीय थिएटर कमांड, शस्त्रास्त्र खरेदी यंत्रणा आणि संरक्षण अकॅडमी संस्थांना फटका बसला असून ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. अलिकडेच चीनचे दोन सर्वात वरिष्ठ जनरल देखील शिस्तभंगाच्या चौकशीच्या कक्षेत आले असताना हा अहवाल समोर आला आहे. अनेक दशकांमधील चीनची ही सर्वात मोठी सैन्यांतर्गत कारवाई असल्याचे मानले जात आहे.

अशाप्रकारच्या कारवाईचा नजीकच्या भविष्यात प्रभाव जवळपास निश्चित आहे. परंतु हा प्रभाव तात्पुरता असू शकतो आणि सैन्य आधुनिकीकरणाची प्रक्रिया वेगाने जारी राहण्याची शक्यता असल्याचे आयआयएसएसचे म्हणणे आहे.

संरक्षण अर्थसंकल्पात वाढ, आव्हान कायम

आयआयएसएसनुसार चीनचा संरक्षण र्खा आशियातील अन्य देशांच्या तुलनेत वेगाने वाढत आहे, परंतु आव्हाने अद्याप कायम आहेत. 2025 मध्ये आशियाच्या एकूण संरक्षण खर्चात चीनची हिस्सेदारी जवळपास 44 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. चीन स्वत:ची सैन्यशक्ती वाढविण्याची रणनीति जारी ठेवून असला तरीही त्याच्या कमांड व्यवस्थेत झालेल्या कमतरतेमुळे त्याची संचालन क्षमता प्रभावित होऊ शकत नसल्याचे संकेत अहवालात देण्यात आले आहे.

Comments are closed.