टी 20 वर्ल्ड कपनंतर क्रमवारीमध्ये धक्कादायक बदल! संजू सॅमसन-ईशान किशनला फायदा, वरुण चक्रवर्ती…

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आयसीसी) बुधवारी (११ मार्च) पुरुष टी२० क्रमवारी जाहीर केली. या ताज्या क्रमवारीमध्ये अनेक धक्कादायक बदल पाहायला मिळाले आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता सहाव्या क्रमांकावर आला आहे. त्याने २०२६च्या विश्वचषकात सर्वाधिक १४ विकेट्स घेतल्या. तसेच तो न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात प्लेयर ऑफ द मॅचही ठरला होता. त्यामध्ये त्याने ४ षटकात १५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. तो सामना भारताने ९६ धावांनी जिंकत तिसऱ्यांदा टी२० विश्वविजेत्याचा चषक जिंकला.
याच स्पर्धेत ज्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना हैरान केले तो म्हणजे संजू सॅमसन. त्याने फलंदाजांच्या क्रमावारीमध्ये १८ स्थांनाची झेप घेतली आहे. आता तो २२व्या क्रमांकावर आहे. तो या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. त्याने पाच सामन्यात १९९.३७च्या स्ट्राईक रेटने ३२१ धावा केल्या. भारताकडून या सर्वाधिक धावा ठरल्या. तसेच त्याने अंतिम सामन्यात ८९ धावांची धमाकेदार खेळी केली होती. त्याच्या या मोठ्या खेळीमुळे भारताने न्यूझीलंडला २५६ धावसंख्येचे लक्ष्य दिले होते.
दुसरीकडे ईशान किशनलाही या क्रमवारीमध्ये दोन स्थानांचा फायदा झाला आहे. त्याने दुसरा क्रमांक गाठला आहे. आयसीसी टी२० फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी अभिषेक शर्मा कायम आहे. यामध्ये तिलक वर्मा सातव्या क्रमांकावर आणि भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे आहे.
भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीचे विश्वचषकानंतर क्रमांक एकचे स्थान हालले आहे. त्याला मागे टाकत अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान नवा क्रमांक-१ चा गोलंदाज बनला आहे. राशिदचे ७५३ रेटिंग पॉइंट्स आहेत. दुसरीकडे वरुणचे ७४० रेटिंग पॉइंट्स झाले आहेत.
Comments are closed.