प्रशिक्षक गौतम गंभीरला मोठा दिलासा! डीपफेक आणि बनावट व्हिडिओ हटवण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach of team india) यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या नावाचा आणि फोटोंचा वापर करून बनवलेल्या खोट्या (Fake) व्हिडिओंच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता या प्रकरणात उच्च न्यायालयाने गंभीर यांच्या बाजूने निकाल दिला आहे.
न्यायमूर्ती ज्योती सिंग यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर असे आढळले की, सोशल मीडियावर असे अनेक पोस्ट आहेत ज्यामध्ये गंभीर यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे. न्यायालयाने मेटा फेसबुक इन्स्टाग्राम, गुगल आणि ॲमेझॉनला असे सर्व बनावट व्हिडिओ सोशल मीडियावरून तातडीने हटवण्याचे आदेश दिले आहेत.
गौतम गंभीर यांचे अनेक ‘डीपफेक’ AI द्वारे बनवलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. विशेष म्हणजे, एका खोट्या व्हिडिओमध्ये ते हेड कोच पदाचा राजीनामा देत असल्याचा दावा करण्यात आला होता, ज्याला 29 लाख व्ह्यूज मिळाले होते. गंभीर यांनी आपल्या अर्जीत म्हटले होते की, त्यांच्या परवानगीशिवाय असे व्हिडिओ अपलोड करणे हे त्यांच्या सन्मानाला आणि प्रतिमेला धक्का लावणारे आहे. यावर न्यायालयाने तातडीने निकाल दिला.
गौतम गंभीर हेड कोच बनल्यानंतर भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी-20 विश्वचषक यांसारखी मोठी जेतेपदे पटकावली. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये (Red Ball) भारतीय संघाची कामगिरी काहीशी निराशाजनक राहिली. त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाला घरच्या मैदानावर दोनवेळा कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. याच पराभवामुळे त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले गेले आणि याच काळात त्यांचे बनावट व्हिडिओ ट्रेंड होऊ लागले होते. आता या कायदेशीर लढाईत विजय मिळवल्यानंतर, आता प्रशिक्षक म्हणून गंभीर यांच्यासमोर 2027 चा एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup) हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.
Comments are closed.