सिराजकडे आता नवी आणि मोठी जबाबदारी! भारत-न्यूझीलंड मालिकेदरम्यानच मिळाली कर्णधारपदाची ऑफर
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये 3 वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने दमदार पुनरागमन केलं आणि मालिका 1-1 ने बरोबरीत आणली. या मालिकेतील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये मोहम्मद सिराजला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. ही मालिका सुरू असताना मोहम्मद सिराजकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सध्या भारतात विजय हजारे ट्रॉफीतील सामने सुरू आहेत. ही स्पर्धा झाल्यानंतर रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेतील साखळी फेरीतील उर्वरीत सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेची सुरूवात 22 जानेवारीपासून होणार आहे. या स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी मोठी अपडेट समोर येत आहे. क्रीकबझने दिलेल्या वृत्तानुसार, रणजी ट्रॉफी स्पर्धेतील उर्वरीत 2 सामन्यांसाठी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने मोहम्मद सिराजची कर्णधार म्हणून निवड केली आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका झाल्यानंतर सिराज मोठी जबाबदारी पार पाडताना दिसून येणार आहे.
याआधी झालेल्या सामन्यांमध्ये राहुल सिंगकडे हैदराबादच्या संघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना हैदराबादला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. हैदराबादला 5 पैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला. तर 3 सामने ड्रॉ राहिले. त्यामुळे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
हैदराबादचा संघ शेवटच्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मोहम्मद सिराज पहिल्यांदाच हैदराबादचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. हैदराबादचा पुढील सामना 22 जानेवारीला मुंबईविरूद्ध, तर 29 जानेवारीला होणार सामना छत्तीसगडविरूद्ध होणार आहे. हा नि्र्णय अचानक घेण्यात आलेला नाही. मोहम्मद सिराज हा हैदराबाद संघातील अनुभवी खेळाडू आहे. त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यापूर्वी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या निवडकर्त्यांनी त्याच्यासोबत चर्चा केली होती.
Comments are closed.