भारत-पाक सामन्याबाबत सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा! टी20 वर्ल्डकप वेळापत्रक समोर येताच दिली 'ही' प्रतिक्रिया
टी20 विश्वचषक 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला 15 फेब्रुवारीला कोलंबो येथे रंगणार आहे. आगामी विश्वचषकात सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहेत. भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत टी20 विश्वचषकात 7 वेळा आमनेसामने आले असून त्यापैकी 6 वेळा टीम इंडियाने विजय मिळवला आहे.
आशिया कपदरम्यान सूर्यकुमार यांनी स्पष्टपणे म्हटले होते की आता भारत-पाकिस्तानमध्ये कोणतीही स्पर्धात्मक वैराची भावना उरलेली नाही. तरीही टी20 विश्वचषकातील भारत-पाक सामना हा चाहत्यांसाठी उत्साहाने भरून टाकणारा क्षण असेल, असे त्याने सांगितले.
टी20 विश्वचषक 2026 च्या शेड्यूल अनाउंसमेंट कार्यक्रमात सूर्यकुमार यादव म्हणाला, “आपला ग्रुप चांगला दिसतोय. 15 फेब्रुवारीला होणाऱ्या भारत-विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, आपण अलीकडेच आशिया कपमध्ये त्यांच्याविरुद्ध सामने खेळलो आहोत. तेव्हा सर्वांनी फक्त क्रिकेटवरच लक्ष केंद्रित केले होते, इतर कोणत्याही गोष्टीवर नाही. तुम्ही सगळ्यांनी ते पाहिलंच असेल. हा एक शानदार सामना असेल आणि भारतीय खेळाडू नेहमीच भारत-पाक सामन्याबद्दल उत्साहित असतात.”
लक्षात घ्या, भारताला विश्वचषकाच्या ग्रुप ए मध्ये स्थान देण्यात आले आहे. ग्रुप ए मध्ये भारतासोबत पाकिस्तान, युएसए, नामिबिया आणि नेदरलँड्स या संघांचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे खेळला जाणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी बीसीसीआय आणि पीसिबी यांच्यात भारत-पाक सामने तटस्थ मैदानावर आयोजित करण्याबाबत सहमती झाली होती, त्यानुसार हा सामना कोलंबो येथे घेतला जात आहे.
आशिया कपदरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादव याने सांगितले होते की भारत सातत्याने पाकिस्तानला पराभूत करत आला आहे, त्यामुळे दोन्ही संघांमध्ये आता ‘रायवलरी’ अशी कोणतीही गोष्ट उरलेली नाही. सूर्यकुमार यांच्या मते, रायवलरी त्या संघांमध्येच असते जिथे 12 सामन्यांमध्ये हेड-टू-हेड रेकॉर्ड 6-6 किंवा 7-5 अशा चुरशीचा असतो.
Comments are closed.