डेव्हिड वॉर्नरच्या ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात मोठा खुलासा; 3 ग्लास वाईन प्यायल्याची पोलिसांसमोर कबुली
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी त्याच्या बॅटमुळे नाही तर एका वादामुळे. खरं तर, डेव्हिड वॉर्नरच्या ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात एक नवे वळण आले असून, वॉर्नरने स्वतः पोलिसांसमोर मद्यपान केल्याची कबुली दिली आहे.
’न्यूजकॉर्प’च्या वृत्तानुसार, वॉर्नरने पोलिसांना सांगितले की, ईस्टर संडेच्या दिवशी तो एका मित्रासोबत होता आणि गाडी चालवण्यापूर्वी त्याने तीन ग्लास वाईन प्यायली होती. यानंतर सिडनीतील मारूब्रा येथील आपल्या घरी परतत असताना, वाटेत पोलिसांनी ‘रँडम ब्रेथ टेस्टिंग’साठी त्याला थांबवले. पोलीस अधिकाऱ्यांनी एका व्हॅनला चेकपोस्टच्या आधीच थांबताना पाहिले आणि त्यानंतर वाहनाजवळ जाऊन तपासणी केली. रस्त्यावरील प्राथमिक चाचणीत वॉर्नरची अल्कोहोल टेस्ट पॉझिटिव्ह आली.
यानंतर वॉर्नरला सिडनीच्या मारूब्रा पोलीस ठाण्यात नेण्यात आले, जिथे तपासात त्याच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण ०.१०४ आढळले. हे प्रमाण कायदेशीर मर्यादेपेक्षा दुप्पट आहे. आता त्याच्यावर ‘मिड-रेंज ड्रिंक ड्रायव्हिंग’चा गुन्हा दाखल करण्यात आला असून, ७ मे रोजी त्याला ‘डाउनिंग सेंटर लोकल कोर्टात’ हजर राहावे लागणार आहे. जर वॉर्नर दोषी आढळला, तर त्याच्या कारकिर्दीवर आणि ब्रँड डील्सवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
हे प्रकरण अशा वेळी समोर आले आहे जेव्हा वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊनही फ्रँचायझी क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. सध्या तो पाकिस्तान सुपर लीग (PSL) २०२६ मध्ये कराची किंग्सचे नेतृत्व करत आहे. स्पर्धेदरम्यान मिळालेल्या विश्रांतीच्या काळात तो ऑस्ट्रेलियाला परतला होता. नुकतेच २ एप्रिल रोजी लाहोरमध्ये त्याने अर्धशतकही झळकावले होते. जर वॉर्नर या प्रकरणात दोषी ठरला, तर त्याचे व्यावसायिक करार आणि व्यावसायिक कारकिर्दीवर गंडांतर येऊ शकते. आता सर्वांचे लक्ष ७ मे रोजी होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीकडे लागले आहे.
विशेष म्हणजे, डेव्हिड वॉर्नरची गणना ऑस्ट्रेलियाच्या सर्वात यशस्वी फलंदाजांमध्ये केली जाते. त्याने ११२ कसोटी सामन्यांत ८७८६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानविरुद्धची नाबाद ३३५ धावांची खेळी त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. मात्र, त्याची कारकीर्द अनेकदा वादांनी वेढलेली राहिली आहे.
Comments are closed.