IND vs WI: आयसीसी स्पर्धा जिंकायची असेल तर भारताला हरवावं..’, भारत-वेस्ट इंडिज वनडे मालिकेपूर्वी प्रशिक्षक डॅरेन सॅमींचे मोठं वक्तव्य!

भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) दोन्ही संघांतील 3 वनडे सामन्यांची मालिका 27 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्या सामन्यापूर्वी वेस्ट इंडिजचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी (Darren Sammy) यांनी ही मालिका त्यांच्या संघासाठी खूप महत्त्वाची असल्याचे सांगितले. या मालिकेतून वनडे क्रिकेटमध्ये त्यांचा संघ सध्या कुठे आहे आणि त्यात किती सुधारणा झाली आहे, हे स्पष्ट होईल. वेस्ट इंडिजने गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ भारतात वनडे मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे ही मालिका त्यांच्यासाठी मोठे आव्हान असून, हा प्रदीर्घ प्रतीक्षेचा काळ संपवण्याची त्यांच्याकडे चांगली संधी आहे.
तिरुवनंतपुरम येथे रविवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना डॅरेन सॅमी म्हणाले की, वेस्ट इंडिजने भारतात गेल्या 24 वर्षांपासून वनडे मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे भारताविरुद्ध खेळून स्वतःला तपासण्याची आणि वनडे क्रिकेटमध्ये आपण कुठे आहोत, हे जाणून घेण्याची त्यांच्याकडे चांगली संधी आहे. भारताविरुद्ध चांगली कामगिरी करून 24 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रतीक्षेचा काळ संपवत मालिका जिंकण्याची संधी खेळाडूंसमोर आहे, असेही त्यांनी सांगितले.
वेस्ट इंडिजचा संघ (West Indies Team) 2027 च्या वनडे विश्वचषकासाठी थेट पात्र ठरू शकलेला नाही. त्यामुळे त्यांना पुढील वर्षाच्या सुरुवातीला पात्रता सामने खेळावे लागणार आहेत. डॅरेन सॅमी यांच्या मते, भारताविरुद्धची ही 3 सामन्यांची वनडे मालिका त्यांच्या संघाच्या तयारीसाठी खूप महत्त्वाची आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मोठी आयसीसी स्पर्धा जिंकायची असेल, तर भारताला पराभूत करावेच लागेल, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे भारताच्या घरच्या मैदानावर आणि वातावरणात भारताला पराभूत केल्यास वेस्ट इंडिजला आपल्या संघाची क्षमता आणि तयारीचा योग्य अंदाज येईल.
डॅरेन सॅमी यांनी पुढे सांगितले की, भारतात चांगली कामगिरी करून विजय मिळवल्यास आपल्या संघाची खरी ताकद आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्याची क्षमता किती आहे, हे समजण्यास मदत होईल. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पात्रता सामन्यांपूर्वी संघाला सातत्याने सुधारत राहणे हे त्यांचे पहिले लक्ष्य आहे. पात्रता सामने जिंकून 2027 च्या विश्वचषकात आपले स्थान निश्चित करण्यासाठी संघाला तयार करायचे आहे, असे सॅमी यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.