अयोध्येतील राम मंदिरापेक्षा वक्फ बोर्डात मोठा घोटाळा

मौलाना रजवी यांची चौकशीची मागणी

वृत्तसंस्था: लखनौ

ऑल इंडिया मुस्लीम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी सुन्नी आणि शिया वक्फ बोर्डात मोठे घोटाळे झाल्याचा आरोप केला आहे. रजवी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून या घोटाळ्यांप्रकरणी चौकशी करविण्याची मागणी केली आहे. योग्य दिशेने तपास झाल्यास हा राम मंदिरातील दानचोरीपेक्षाही मोठा घोटाळा ठरेल असा दावा त्यांनी केला आहे.

समाजवादी पक्षाचे सरकार असताना वक्फच्या जमिनींच्या खरेदीविक्रीचा अवैध व्यवसाय बहरला होता. सप शासनकाळात वक्फ बोर्डातील पदाधिकाऱ्यांनी जमिनींचे व्यवहार केले. मुलायम सिंह यादव तीनवेळा तर अखिलेश यादव हे एकवेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. या सर्व शासनकाळांमध्ये आझम खान यांच्याकडे अल्पसंख्याक, वक्फ अन् हज मंत्रालयांची जबाबदारी राहिली होती. आझम खान यांच्या निकटवर्तीयांना वक्फ बोर्डाचा अध्यक्ष अन् सदस्य केले जात होते, असे म्हणत मौलाना रजवी यांनी अनेक नावांचा उल्लेख केला आहे.

वक्फच्या जमिनींचा गैरवापर

वक्फच्या जमिनी गरीब, दुर्बल आणि अनाथ लोकांसाठी होत्या. या जमिनींवर शाळा, कॉलेज, रुग्णालये अन् मदरसे उभे करणे अपेक्षित होते, परंतु वक्फ बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी या जमिनी विकून लूट केली. वक्फमधून होणाऱ्या उत्पन्नाचा योग्य वापर केला असता तर पूर्ण भारतातील मुस्लिमांची गरीबी दूर होऊ शकली असती असा दावा त्यांनी केला.

Comments are closed.