बिहारचा विजय ऐतिहासिक, अभूतपूर्व आहे

पंतप्रधान मोदी यांच्याकडून भलावण, जातीपातींचे राजकारण मतदारांकडून उध्वस्त, विकास हाच मुद्दा

वृत्तसंस्था / गांधीनगर

बिहारच्या जनतेने जातीपातींवर आधारित विषारी राजकारण पूर्णत: ध्वस्त केले आहे. त्यांनी विकासाच्या पारड्यात आपले वजन टाकले आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा अभूतपूर्व असा ऐतिहासिक विजय झाला आहे, अशी भलावण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. बिहारच्या निर्णयानंतर ते गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. सुरत येथे एका कार्यक्रमात ते भाषण करीत होते.

त्यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या युतीवर घणाघाती टीका केली आहे. ही युती जामीनावर बाहेर असणारा नेता आणि ‘नामदार’ नेता यांची आहे. या दोन्ही नेत्यांनी गेली दोन वर्षे बिहारमध्ये जातींच्या आधारावर समाजाला फोडण्याचा प्रयत्न केला. जात्याधारित राजकारणाचे वीष पेरुन स्वत:चे राजकारण साध्य करण्याचा त्यांचा हेतू होता. तथापि, जनतेने त्यांच्या या घातक राजकारणाला मूठमाती दिली आहे. आमच्या आघाडीला सर्व समाजघटकांचा भरपूर पाठिंबा मिळाला आहे. ही आमच्या विकासकामांची पोचपावती आहे. आम्ही भविष्यकाळात विकासाचीच ही गंगा वेगाने पुढे नेणार आहोत, असे प्रतिपादन त्यांनी येथे केले.

दलितांचे भरघोस समर्थन

बिहारमध्ये विधानसभेच्या 38 जागा अशा आहेत, की जेथे दलितांची मते निर्णायक ठरतात. या सर्व 38 जागा आमच्या आघाडीने जिंकल्या आहेत. त्यामुळे दलित समाजाचा आम्हाला भरघोस पाठिंबा मिळाला आहे, हे या परिणामांवरुन सिद्ध होत आहे. सामाजिक द्वेषाची आग लावून आपली पोळी भाजून घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न सपशेल अयशस्वी ठरला आहे, हे या आकडेवारीवरुन दिसून येते. जनतेने विरोधकांवा हा कावा ओळखला आहे, असा घणाघात त्यांनी केला.

'मुस्लीम लीग माओवादी काँग्रेस'

या निवडणुकीत मतदारांनी ‘मुस्लीम लीग माओईस्ट काँग्रेस’ला चारी मुंड्या चीत केले आहे. काँग्रेसच्या नव्या नेत्यांच्या धोरणामुळे काँग्रेसमधील बुजुर्ग नेते नाराज झाले आहेत. काँग्रेस आपल्या विचारसरणीपासून भरकटते आहे, हे त्यांना स्पष्ट दिसत आहे. माननीय इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या नेतृत्वात काम केलेले अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेते आज राहुल गांधी यांच्या धोरणांमुळे चिंताग्रस्त झाले आहेत. काँग्रेसमध्ये वैचारिक फूट पडली आहे, असा आरोप त्यांनी केला.

पराभव पचविण्यास असमर्थ

काँग्रेसने तिच्या दारुण पराभवाची खरी कारणे ओळखण्याची क्षमता गमावली आहे. हा पक्ष दुर्बळ झाला असून त्याच्या नव्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या राजकीय करीअरसंबंधी चिंता वाटू लागली आहे. काँग्रेस पक्षात आपले भवितव्य सुरक्षित नाही, ही भावना काँग्रेसच्या नव्या कार्यकर्त्यांमध्ये जोर धरु लागली आहे. त्यामुळे एकीकडे जुन्या नेत्यांची नाराजी, तर दुसरीकडे नव्या नेत्यांचा अविश्वास अशा कैचीत हा पक्ष सापडला असून याला कारण या पक्षाची धोरणे हे आहे. ती सुधारल्याशिवाय तरणोपाय दिसत नाही, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.

स्वावलंबी, विकसित भारत

आम्ही भारताला आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून विकसीत देश बनविण्याच्या प्रयत्नांमध्ये आहोत. विरोधी पक्षांच्या नेत्यांना स्वदेशी, आत्मनिर्भरता, विकसीत भारत हे शब्द नीट उच्चारताही येत नाहीत. ज्या नेत्यांना युवकांच्या प्रगतीशी काहीही देणेघेणे नाही, अशांना या देशातील युवक स्वीकारणार नाहीत, याची मला शाश्वती आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या परिणामांनी अशा विद्वेषी नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली असून हा त्यांच्यासाठी मोठा धडा आहे. त्यातून ते काही शिकणार नाहीत, हे ही दिसत आहे. तथापि, आम्ही आमच्या विकासाच्या मार्गावर अग्रेसर राहणार आहोत, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

विरोधकांचे राजकारण द्वेषाने भरलेले

ड सकारात्मक राजकारणापेक्षा विरोधकांचा द्वेष पसरवण्यावर अधिक भर

ड बिहारच्या जनतेचा विश्वास विकासात्मक धोरणे आणि कार्यक्रमांवरच

ड नितीश कुमार यांच्या नेतृत्वात बिहारने केली आहे अभूतपूर्व प्रगती

ड आम्हाला पुन्हा कधीच जंगलराज नको हा बिहारच्या जनतेचा संदेश

Comments are closed.