65 साखर कारखान्यांकडून 3,101 कोटी रुपयांची बिले थकबाकी आहेत

मंत्री शिवानंद पाटील यांची विधानपरिषदेत माहिती : 33 कारखान्यांना नोटिसा

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना 65 साखर कारखान्यांनी अद्याप 3,101.91 कोटी रुपये बिले मिळणे बाकी आहे. थकबाकी त्वरित देण्यासाठी 33 साखर कारखान्यांना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती साखरमंत्री शिवानंद पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

विधानपरिषद सदस्य दिनेश गुळीगौडा यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री शिवानंद पाटील म्हणाले, राज्यात एकूण 99 नोंदणीकृत साखर कारखाने आहेत. त्यापैकी 79 कारखाने सध्या कार्यरत आहेत. 2024-25 या हंगामात 28 फेब्रुवारी 2025 अखेरपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना 17,595.92 कोटी रुपये बिले द्यावी लागणार होती. त्यापैकी 14,655.91 कोटी रु. शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. 2024-25 चा ऊस गाळप हंगाम सुरु असून ऊस बिले देण्यासाठी वेळ आहे. मात्र, या हंगामात थकबाकी असणाऱ्या साखर कारखान्यांना 16 जानेवारी व 4 फेब्रुवारी रोजी वैधानिक नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहितीही मंत्री शिवानंद पाटील यांनी दिली.

…तर 15 टक्के व्याज द्यावे लागेल!

ऊस (नियंत्रण) आदेश 1966 च्या खंड 3 मध्ये, साखर कारखान्यांना ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना ऊस पुरवठा केलेल्या 14 दिवसांच्या आत बिले द्यावी लागतात. निर्धारित कालावधीत बिले न दिल्यास ऊस (नियंत्रण) आदेश 1966 च्या खंड 3अन् नुसार 14 दिवसांनंतर उशिरा बिले दिलेल्या दिवसांसाठी शेतकऱ्यांना 15 टक्के व्याज द्यावे लागते, असेही त्यांनी सांगितले.

ऊस (नियंत्रण) आदेश 1966 च्या खंड 8 मध्ये ससंबंधित साखर कारखान्यांनी विहित कालावधीत ऊस बिले न दिल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना जमीन महसुलाची थकबाकी म्हणून ऊसबिले वसुली प्रमाणपत्र जारी करण्याची तरतूद आहे. सरकारी अधिसूचनेनुसार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वसुली प्रमाणपत्रे जारी करण्याचे अधिकार ऊस विकास आणि साखर संचालक व आयुक्तांना देण्यात आले आहेत, अशी माहितीही मंत्री शिवानंद पाटील यांनी दिली.

Comments are closed.