BJP appointed liaison minister in 17 districts in marathi


– प्रेमानंद बच्छाव

मुंबई : रायगड आणि नाशिक जिल्हा पालकमंत्री पदावरून सत्ताधारी महायुतीत धुसफूस सुरू असताना भाजपने बुधवारी (5 फेब्रुवारी) 17 जिल्ह्यात संपर्क मंत्र्यांची नेमणूक जाहीर केली. पक्ष आणि सरकार यामध्ये समन्वय साधण्यासाठी जिल्हा संपर्क मंत्री नियुक्त केल्याचे भाजपने म्हटले असले, तरी ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यात संपर्क मंत्री देऊन पक्षाने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शह दिल्याचे बोलले जाते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाणे आणि मुंबई शहर या दोन जिल्ह्यात भाजपने संपर्क मंत्री दिले आहेत. शिंदे यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले वनमंत्री गणेश नाईक यांची ठाणे जिल्ह्यासाठी तर कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची मुंबई शहर जिल्ह्यासाठी नेमणूक झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे आणि बीड जिल्ह्यात अनुक्रमे चंद्रकांतदादा पाटील, पंकजा मुंडे हे भाजपचे जिल्हा संपर्क मंत्री असणार आहेत. (BJP appointed liaison minister in 17 districts in marathi)

हेही वाचा : Shirish More Suicide : माझी लाडकी पिनू, प्रियांका…; शिरीष महाराजांनी सुसाईड नोटमधून होणाऱ्या बायकोची मागितली माफी 

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटात जबरदस्त रस्सीखेच असताना भाजपने या संपर्क मंत्री म्हणून या जिल्ह्याची जबाबदारी सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्यावर सोपवली आहे. तर नाशिक जिल्हा पालकमंत्री पदाला स्थगिती मिळाल्याने सध्या या पदापासून वंचित असलेल्या गिरीश महाजन यांच्याकडे संपर्क मंत्री म्हणून जळगाव जिल्ह्याची धुरा देण्यात आली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत पालकमंत्री असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने जिल्हा संपर्क मंत्री म्हणून नितेश राणे यांना तर नंदुरबार जिल्ह्यात जयकुमार रावल यांची नियुक्ती केली आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात संपर्क मंत्री नेमून भाजपने पक्षीय पातळीवर समांतर सत्ताकेंद्र तयार केल्याची चर्चा आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहीने या नियुक्त्या घोषित करण्यात आल्या. त्यामुळे नजीकच्या काळात शिंदे आणि अजित पवार गटाकडूनही जिल्हा संपर्क मंत्री नेमले जाण्याची शक्यता आहे.

भाजपचे जिल्हानिहाय इतर संपर्क मंत्री

गोंदिया : पंकज भोयर
बुलढाणा : आकाश फुंडकर
यवतमाळ: अशोक उईके
वाशिम: राधाकृष्ण विखे पाटील
छत्रपती संभाजीनगर : अतुल सावे
धाराशिव : जयकुमार गोरे
हिंगोली: मेघना बोर्डीकर
सातारा: शिवेंद्रराजे भोसले
कोल्हापूर : माधुरी मिसाळ


Edited by Abhijeet Jadhav



Source link

Comments are closed.