BJP Chandrashekhar Bawankule criticized Rahul Gandhi
मुंबई : काही दिवसांपूर्वी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारताचे परराष्ट्र धोरण कोलमडले असल्याचा दावा केला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यस्थी करण्यास कोणी सांगितले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारताने राबवलेले ऑपरेशन सिंदूर तसेच, भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी या मुद्द्यांवरून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला उत्तर देताना भाजपच्या नेते आणि महाराष्ट्रातील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. (BJP Chandrashekhar Bawankule criticized Rahul Gandhi)
हेही वाचा : Chandrashekhar Bawankule : राज्यात सर्व महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष महायुतीचेच : बावनकुळे
“ज्यांना अजून देश कळला नाही, त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?” असा टोला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे. “राहुल गांधी यांना काही कळत नाही. ते कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करत नाहीत. राहुल गांधी हे शिकून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. जर आपल्याला काही कळत नसेल तर ते शिकून घेतले पाहिजे. राहुल गांधी यांना नेमके काय झाले आहे, हे कळत नाही आहे?” अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच ते पुढे म्हणाले की, “राहुल गांधी यांना अजून देश कळलेला नाही. त्यांना परराष्ट्र धोरण आणि परराष्ट्र मंत्रालय काय समजणार?” अशी बोचरी टीका केली आहे.
LIVE |📍नागपूर | पत्रकारांशी संवाद
https://t.co/iLAw0jbjii— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) May 24, 2025
“राहुल गांधी यांना परराष्ट्र मंत्री आणि सरकार अपयशी ठरले आहे, असे वाटत असेल तर त्यांनी वर्षातून दोन महिने परदेशात जाऊन राहिले पाहिजे. राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परराष्ट्र धोरण शिकवत आहेत, याउलट राहुल गांधी यांनीच दहशतवादाविरोधातील लढाई कशी लढली जाते? तसेच आमचे सैनिक कसे लढतात? हे शिकून घेतले पाहिजे,” असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींना सल्ला दिला आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या पंचनाम्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मी पण काल व्हीसीद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. लवकरच पंचनामे होऊन सर्वांना मदत मिळेल. निवडणुकांच्या बाबतीत कुठलाही संभ्रम नाही. मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सर्व निवडणुका महायुती मिळून एकत्र लढणार आहे. काही ठिकाणी चर्चा सुरू आहेत आम्ही वेगळे लढू. पण महायुतीचा निर्णय एकत्र लढण्याचाच आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.